यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी:-गणेश राठोड
उमरखेड : तालुक्यातील पोफाळी शिवारातील शेतातील उभ्या ऊसाला वीज वितरण कंपनीच्या शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची घटना दिनांक ११ डिसेंबर रोजी दुपारी दोन वाजता घडली. नत्था देवजी बरडे असे नुकसान झालेल्या शेतकऱ्याचे नाव असुन त्यांचा शेत सर्व्हे नंबर ४४/१ मध्ये ६ एकर क्षेत्रात उभा असलेला अंदाजे ३०० टन ऊस जळून खाक झाला आहे. यामुळे शेतकऱ्याचे अंदाजे अकरा लाख दहा हजाराचे नुकसान झाले आहे. शेतातून जाणाऱ्या विद्युत विभागाच्या तारांमुळे शॉर्टसर्किट झाले होते. यामुळे उसाने भर दिवसा पेट घेतल्याचे शेतकऱ्याचे म्हणणे आहे. विद्युत विभागाच्या गलथन कारभारामुळे ही घटना घडली असून शेतकरी नत्था देवजी बरडे यांनी पोफाळी पोलीस स्टेशनला याबाबत तक्रार सुद्धा दिली आहे. शेतकऱ्याने नुकसान भरपाई देण्याची मागणी सुद्धा यावेळी केली आहे. शेतकऱ्याला तात्काळ आर्थिक मदत देऊन दिलासा देण्याची मागणी परिसरातील शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.


