सिद्धार्थ कदम
यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी
देशाचे सर्वोच्च न्यायाधीश मा. भूषण गवई यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या घटनेचा भीम आर्मी, यवतमाळ जिल्हाध्यक्ष अशोक भालेराव आणि आजाद समाज पार्टी युवा मोर्चा, यवतमाळ जिल्हाध्यक्ष राजकुमार भगत तर्फे तीव्र निषेध करण्यात आला आहे. यासंदर्भात राष्ट्रपती महोदयांना उद्देशून निवेदन मा. उपविभागीय अधिकारी, पुसद यांच्या मार्फत देण्यात आले.
निवेदनात म्हटलं आहे की, “भारताचे सरन्यायाधीश मा. भूषण गवई हे छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारधारेवर चालणारे न्यायप्रिय व्यक्तिमत्त्व आहेत. अशा व्यक्तीवर हल्ला करणे म्हणजे देशाच्या संविधानावर आणि लोकशाही मूल्यांवर थेट आघात करणे आहे.”
संविधानानुसार न्यायसंस्था ही देशाचा प्रमुख आधारस्तंभ असल्याने या हल्ल्याच्या घटनेत सहभागी असलेल्या सर्व आरोपींवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली. तसेच अशा घटना पुन्हा घडू नयेत म्हणून केंद्र व राज्य सरकारने कडक कायदेशीर तरतुदी व सुरक्षाव्यवस्था सुनिश्चित करावी, ही अपेक्षा व्यक्त करण्यात आली.
यावेळी भीम आर्मी, यवतमाळ जिल्हाध्यक्ष अशोक भालेराव आणि आजाद समाज पार्टी युवा मोर्चा, यवतमाळ जिल्हाध्यक्ष राजकुमार भगत, गिरीधर कांबळे, अंकुश देवकते , गोवर्धन राठोड, अर्जुन लांडगे, गजानन देवकते इत्यादी पदाधिकारी निवेदन देता वेळेस उपस्थित होते

