महाक्रांती न्यूज नेटवर्क: – युसूफ पठान (उपसंपादक)
देशाचे सरन्यायाधीश माननीय भूषण गवई साहेब यांच्यावर झालेला हा भ्याड हल्ला हा केवळ एका व्यक्तीवर झालेला हल्ला नसून भारतीय न्यायव्यवस्था आणि लोकशाही मूल्यांवर झालेला थेट प्रहार आहे. न्यायव्यवस्थेच्या सर्वोच्च पदावर असलेल्या व्यक्तीवर अशा प्रकारे हल्ला होणे हे अत्यंत निंदनीय, असंवेदनशील आणि लोकशाही परंपरांना कलंकित करणारे कृत्य आहे.
सर्व सेवा संघ या घटनेचा तीव्र आणि सार्वजनिक निषेध करतो. अशा घटना समाजात असहिष्णुता आणि अराजकतेची बीजे पेरतात — जी लोकशाही समाजासाठी अत्यंत घातक आहेत. न्यायव्यवस्था ही लोकशाहीचा प्रमुख स्तंभ आहे आणि तिच्या गौरव व प्रतिष्ठेचे रक्षण करणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे.
या प्रकरणातील दोषींवर तात्काळ आणि कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी आम्ही केंद्र तसेच राज्य सरकारकडे करतो. तसेच देशातील प्रत्येक नागरिकाने लोकशाही मूल्ये आणि न्यायव्यवस्थेच्या प्रतिष्ठेचे रक्षण करण्यासाठी सदैव सजग राहावे, अशी विनंती करतो.

