विजय सिंग :- हेड रिपोर्टर
ठाणे – राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाच्या ठाणे शहर (जिल्हा) अध्यक्षपदी डाॅ.जितेंद्र आव्हाड यांचे निकटवर्तीय मा. नगरसेवक तथा ज्येष्ठ नेतृत्व मनोज प्रधान यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
डाॅ. जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनानुसार राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाच्या ठाणे जिल्हा मध्यवर्ती कार्यालयात कार्यकर्त्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. विद्यमान कार्याध्यक्ष प्रकाश पाटील यांनी अध्यक्षपदासाठी मनोज प्रधान यांचे नाव सुचविले. या बैठकीत जवळपास सर्वच कार्यकर्त्यांनी मनोज प्रधान यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले. त्यानंतर प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी मुंबईत प्रधान यांच्या नावाची घोषणा केली.
डाॅ.जितेंद्र आव्हाड यांचे निकटवर्तीय असलेले प्रधान हे मितभाषी आणि उत्कृष्ट संघटक म्हणून ओळखले जातात. उच्चशिक्षित असलेल्या प्रधान यांनी काही काळ ठाणे महानगर पालिकेत नगरसेवक पदही भूषविले आहे. प्रखर काँग्रेसी विचारांचे असलेले प्रधान हे विद्यार्थी दशेपासूनच सामाजिक जीवनात कार्यरत असून काँग्रेस एकसंघ असताना ते युवक काँग्रेसचे ठाणे शहर अध्यक्ष म्हणूनही कार्यरत होते.

