वर्धा प्रतिनीधी: – इम्रान खान
सावंगीच्या परिसरात मोठ्या प्रमाणात अमली पदार्थ गांजा विक्रीचा बेत सावंगी पोलिसांनी हाणून पाडला. याप्रकरणी दोघांवर गुन्हा नोंद करण्यात आला असून, एकाला अटक केली आहे. तर एक जण फरार आहे. त्याच्या ताब्यातून ३ किलो १०० ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला. ही कारवाई सालोड-हिरापूर पुनर्वसन नेरी परिसरात केली.रूपेश घनश्याम उईके (२३, रा. बुरड मोहल्ला, वर्धा), असे अटक केलेल्याचे तर अफसर शेख (४२, रा. सालोड, टी-पॉइंट, सालोड-हिरापूर), असे फरार आरोपीचे नाव आहे. नेरी पुनर्वसन येथील तलावजवळील मंदिर परिसरात अफसर शेख (रा. सालोड) व त्याच्या ओळखीचा एक व्यक्ती अमली पदार्थ गांजा विक्री करण्यासाठी येत असल्याची माहिती सावंगी पोलिसांना मिळाली होती. त्या आधारावर सापळारचून कारवाई केली असता दोन व्यक्ती दुचाकीवर दिसून आले. पोलिसांची चाहूल लागताच अफसर शेख (रा. सालोड) हा पसार झाला. तर रूपेश घनश्याम उईके याला पकडण्यात पोलिसांना यश आले. त्याची झडती घेतली असता त्याच्या मोपेड दुचाकीमधून स्कूल बॅगमध्ये अमली पदार्थ गांजा ३ किलो १०० ग्रॅम मिळून आला. त्याच्या ताब्यातून एक मोबाइल, गांजा, दुचाकी, असा १ लाख ८४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.उपविभागीय पोलिस अधिकारी प्रमोद मकेश्वर यांच्या मार्गदर्शनात रामनगर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक बिपीन इंगळे यांच्यासह सावंगी पोलिस ठाण्याचे ठाणेदार सहायक पोलिस निरीक्षक संदीप कापडे, पोलिस उपनिरीक्षक सतीश दुधाणे, नबी शेख, सतीश दरवरे, संजय पंचभाई, स्वप्नील मोरे, निखिल फुटाणे, अमोल जाधव या पोलिस कर्मचाऱ्यांनी केली.

