लेखक :-प्रदीप चौधरी नागपूर
आज फेसबूकवर एक पोस्ट पाहिली — एका म्हाताऱ्या जोडप्याचा फोटो आणि त्याखाली लिहिलं होतं:
- “पुन्हा जन्म नाही… केव्हा संपेल जीवन, कोणालाच माहिती नाही. मनासारखं जगून घ्या, कारण पुन्हा जन्म नाही.”
ही ओळ वाचून मनात अनेक विचारांचं काहूर माजलं. खरंच, जन्म फक्त एकदाच मिळतो आणि किती जणांना आपलं आयुष्य मनासारखं जगता येतं? अनेकांच्या बाबतीत तर निवृत्तीनंतरच जाणवतं की, “अरे! आपलं खरं जगणंच राहून गेलं…”
बालपण म्हणजे आठवणींचा खजिना — ते सुंदर गाव, नदीकाठचा निसर्ग, प्रेमळ माणसं, शाळेतील मस्ती, कबड्डीचे डावपेच, पोहण्याच्या स्पर्धा… हे सारं क्षणार्धात सरून जातं आणि कळतही नाही.
हायस्कूलसाठी जिल्ह्याच्या ठिकाणी गेलो तेव्हा सगळं नवीन होतं — नवं शहर, नवे लोक, नवीन मित्र. सुरुवातीला सगळं कृत्रिम वाटलं, पण हळूहळू त्यात रुळलो. शालेय शिक्षण संपवून महाविद्यालयात प्रवेश घेतला आणि आयुष्याने वेगळी वाट दाखवली.
त्या काळी ‘आनंद’ म्हणजे महाविद्यालयीन सांस्कृतिक कार्यक्रम, मैफली आणि स्नेहसंमेलन. पण परिस्थितीमुळे फाजील खर्च टाळावा लागत असे. सहलीसाठी तर वेळ आणि पैसा दोन्ही नव्हतं. शिक्षण पूर्ण करून नोकरीत पाऊल ठेवलं आणि खरी दुनिया कळली.
नोकरी म्हणजे फक्त मेहनत, जबाबदाऱ्या आणि धावपळ. कामाच्या धबडग्यात एन्जॉयमेंट तर लांबच, कुटुंबालाही पुरेसा वेळ देता आला नाही. दिवसामागून दिवस जात राहिले आणि अखेर निवृत्तीचा दिवस आला.
- तेव्हा मात्र मनात एकच प्रश्न उमटला — “हे काय झालं? आपण जगलोच नाही… ना कुठे फिरलो, ना आनंद घेतला!”
निवृत्तीनंतर मात्र मनात संकल्प केला — आता भारत दर्शन करायचं, परदेशातही फिरायचं. पण त्यावेळी शरीर आणि प्रकृती साथ देईलच असं कुणी सांगू शकत नाही. पाय थकलेले असतात, शरीर जड झालेलं असतं.
म्हणूनच आयुष्यभर मेहनत करीत असताना शरीराकडे दुर्लक्ष न करता त्याची काळजी घेणं महत्त्वाचं आहे. सुदृढ शरीरासाठी योग्य आहार, योग्य व्यायाम, पोषणमूल्यपूर्ण आहार आणि संतुलित जीवनशैली हीच गुरुकिल्ली आहे.
आज निर्णय घ्या — शरीराची योग्य काळजी घ्या, शरीरावर प्रेम करा. कारण संपूर्ण आयुष्य मुलांच्या भविष्याकरिता खर्च करताना आपण स्वतःला हरवून बसतो. पण आता स्वतःसाठीही थोडा वेळ द्या.
- पुन्हा जन्म नाही… म्हणून आजच जगायला शिका!

