इम्रान खान सरफराज खान:- बार्शीटाकळी प्रतिनीधी
- अकोला पातूर तालुक्यातील सावरखेड या दुर्गम भागात आज पहाटे चार वाजताच्या सुमारास एक धक्कादायक घटना घडली.
या घटनेत एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून, दोन जण जखमी झाले आहेत. या घटनेने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडवली आहे. संशयास्पद परिस्थितीत घडलेल्या या घटनेला जादूटोणा आणि गोवंश चोरीचा रंग लागल्याचे समोर आले आहे.
- सावरखेड हे गाव अतिशय दुर्गम आणि विरळ लोकवस्तीचे आहे. गाव जंगल परिसरात असल्याने येथे फारसा वावर नसतो. गुरुवारी मध्यरात्री काही जण चारचाकी वाहनातून जंगलात गेले होते. मिळालेल्या माहितीनुसार, हे लोक जादूटोणा करून “पैशाचा पाऊस” पाडण्याचा प्रयत्न करीत होते,
अशी विश्वसनीय माहिती अकोला न्यूज नेटवर्कला मिळाली आहे.मात्र, गावकऱ्यांना संशय आला की हे लोक गोवंश चोरी करण्यासाठी आले आहेत. गावकऱ्यांनी जंगलाकडे धाव घेतल्याने संशयितांनी गाडी सोडून पळ काढला. पळून जात असताना, यातील एका व्यक्तीचा तोल जाऊन तो दरीत कोसळला. त्याचा जागीच मृत्यू झाला. मृत व्यक्तीचे नाव रहेमत खान हमीद खान असे असून, तो वाशिम जिल्ह्यातील कारंजा येथील रहिवासी असल्याचे स्पष्ट झाले आहे.

संशयित व्यक्ती जंगलात जादूटोणा करण्यासाठी आल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे. या व्यक्तींनी “पैशाचा पाऊस” पाडण्यासाठी काही विधी करण्याचा प्रयत्न केला असल्याचे बोलले जात आहे.
मात्र, गावकऱ्यांनी हा प्रकार गोवंश चोरीशी संबंधित असल्याचा दावा केला आहे.गावकऱ्यांना जंगलातील हालचालींचा संशय आल्यावर ते घटनास्थळी पोहोचले. गावकऱ्यांच्या हालचाली लक्षात येताच संशयितांनी गाडी सोडून जंगलातून पळ काढले. पळून जात असताना, यातील एका व्यक्तीचा तोल जाऊन तो दरीत पडला आणि त्याचा मृत्यू झाला. मृत व्यक्तीचा मृतदेह जंगलात सापडला आहे.अपघातानंतर संशयित वाहनाचे टायर कोणीतरी जाळून टाकल्याची माहितीही समोर आली आहे. ही कार नेमकी कोणाच्या मालकीची होती, याचा शोध पोलीस घेत आहेत.
या घटनेत आणखी दोन व्यक्ती जखमी झाले असून, त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.पातूर पोलीस या घटनेचा तपास करत आहेत. जादूटोण्याचा दावा आणि गोवंश चोरीचा संशय आहे, मात्र मृतक रहेमत खान हा खोल दरीत पडला असल्याचे त्याच्या साथीदारांनी सांगितले मात्र प्रत्यक्षात रस्त्याच्या कडेला असलेल्या केवळ दीड फुटाच्या खड्डयात त्याचा मृतदेह पडून असल्याने अपघात की घातपात यामागील सत्य शोधण्यासाठी पोलिसांनी घटनास्थळी छाननी केली आहे.
मृतकाच्या परिवाराला बोलावून घटनेचा तपशील विचारला जात आहे. या प्रकरणात अधिक माहिती मिळवण्यासाठी संशयितांच्या व वाहन मालकाचा शोध घेतला जात आहे.या घटनेने सावरखेड गावातील नागरिक आणि आसपासच्या भागात भीतीचे वातावरण निर्माण केले आहे. जादूटोणा, गोवंश चोरी आणि हिंसाचार यामुळे परिसरात गोंधळ उडाला आहे. गावकऱ्यांनी या प्रकरणात तात्काळ कारवाई करण्याची मागणी केली आहे.सावरखेड जंगलातील ही घटना नक्की जादूटोण्याचा प्रकार आहे की गोवंश चोरीचा प्रयत्न, याबाबत पोलीस तपास सुरू आहे.
- मृत्यू झालेल्या व्यक्तीचा कुटुंब, गाडीचे जाळले जाणे, तसेच गावकऱ्यांच्या आरोपांची सत्यता लवकरच उघड होईल. पातूर पोलीस या प्रकरणाचा तपशीलवार तपास करत असून, लवकरच या प्रकरणावर अधिकृत खुलासा केला जाईल.
