पुणे विभाग : सचिन दगडे
पुणे : कारेगाव (ता. शिरुर) येथील चिंतामणी हॉस्पिटल जवळ एका मनी ट्रान्सफरच्या दुकानात चौघांनी कोयत्याने दहशत माजवत दुकानात तोडफोड करत 35 हजार रुपये चोरुन नेल्याची घटना घडली आहे.
रांजणगाव एमआयडीसी पोलिस स्टेशन येथे प्रथमेश उर्फ बच्चा नवले, आयर्न नवले, ओम पवार व वैभव गाडे या चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कारेगाव (ता. शिरुर) येथील ज्ञानेश्वर डांगे व ऋषिकेश डांगे हे त्यांच्या मनी ट्रान्सफरच्या दुकानात असताना प्रथमेश नवलेसह तिघेजण दुकानात आले त्यांनी ज्ञानेश्वर व ऋषिकेश यांना शिवीगाळ दमदाटी करत दुकानाचे शटर खाली घेऊन दोघांना कोयत्याचा धाक दाखवत दुकानातील दरवाज्याची काच व फिंगर प्रिंट घेण्याचे डिवाइस मशीन फोडून नुकसान केले. तसेच कोयता दाखवत दुकानातील ३५ हजार रुपये काढून घेत हातातील कोयता फिरवत दहशत माजवत चौघेजण पैसे घेऊन गेले.
याबाबत ज्ञानेश्वर कान्हू डांगे (वय २१ वर्षे रा. सोने सांगवी ता. शिरूर जि. पुणे) यांनी रांजणगाव एमआयडीसी पोलिस स्टेशन येथे फिर्याद दिल्याने पोलिसांनी प्रथमेश उर्फ बच्चा नवले, आयर्न नवले, ओम पवार व वैभव गाडे या चौघांवर गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक निळकंठ तिडखे हे करत आहेत.


