पुणे विभाग प्रतिनीधी : सचिन दगडे
पुणे : पुण्याच्या रस्त्यावर पुन्हा एकदा गुंडांचा हैदोस पाहायला मिळाला आहे. चहाची उधारी न दिल्याने एका गुंडाने कोयते भिरकवत तुफान राडा केला आहे. तसंच पान शॉप आणि अंडा भुर्जीच्या गाडीची तोडफोड केली आहे.याप्रकरणी विमानतळ पोलिसांनी अक्षय संजय सगळगिळे या आरोपीला अटक केली आहे.
अक्षय सगळगिळे हा विशाल कैलास पालखे यांच्या पान शॉपवर आला आणि त्याने चहा मागितला, पण विशाल यांनी चहा उधार द्यायला नकार दिला, यानंतर अक्षयने विशाल यांना धमकी दिली आणि तो कोयते भिरकवू लागला. आपण इथले भाई आहोत, कुणाच्या बापाला घाबरत नाही. कुणी जर मध्ये आलं तर त्याच्या खांडोळ्या केल्याशिवाय राहणार नाही, अशी धमकी अक्षयने दिली. तसंच विशाल यांच्या पान शॉपमधील साहित्यही फोडलं.
कोयते भिरकवून धमकी देत असतानाच अक्षयने बाजूलाच असलेल्या सुधाकर म्हस्के यांच्या अंडा भुर्जीच्या शॉपमधील अंड्याचे क्रेट तसंच शॉपमधील बल्ब फोडले, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. पुण्याच्या लोहगाव भागातल्या पोरवाल रोडवर विशाल पालखे यांचं करण पान शॉप आहे. या पान शॉपवर 12 डिसेंबरच्या रात्री 10.15 वाजता हा प्रकार घडला आहे.
याआधीही अक्षय सगळगिळे याच्या टोळीवर पुणे पोलिसांनी मोक्का अंतर्गत कारवाई केली होती. अक्षय सगळगिळे हा रोहन चव्हाण याच्या टोळीचा सदस्य होता, तेव्हा या टोळीने बुधवार पेठेतल्या व्यापाऱ्यांना तलवारीचा धाक दाखवून लुटलं होतं. याप्रकरणी पोलिसांनी अक्षयवर मोक्का अंतर्गत कारवाई केली होती.


