(पालिका प्रशासन/क्राईम न्युज : यांच्या मार्फत)
नवी मुंबईतील सीबीडी बेलापूर परिसरात राहणाऱ्या एका ४४ वर्षीय स्ट्रॅक्चरल अभियंत्याला शेअर ट्रेडिंगच्या नावाखाली सुमारे 20 लाख 35 हजार रुपयांची फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी सीबीडी बेलापूर पोलिस ठाण्यात सायबर गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून, सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
पितम दिगंबर खीलारे (वय ४४) असे फसवणूक झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, २७ डिसेंबर २०२४ रोजी त्यांना ‘प्युअर प्रॉफिट’ नावाच्या कंपनीकडून फोन आला. प्रिती जाधव नावाच्या व्यक्तीने शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीसाठी संपर्क साधला आणि मोठा नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवले. त्यानंतर मानव अवस्थी नावाच्या व्यक्तीनेही (मोबाईल क्र. ८४५१९९३८१०) खीलारे यांच्याशी संपर्क साधून ही गुंतवणूक कायदेशीर असल्याचे सांगितले.
खीलारे यांनी प्रिती जाधव यांच्या सांगण्यावरून ‘प्युअर प्रॉफिट’ या प्लॅटफॉर्मवर नोंदणी करण्यासाठी ३० डिसेंबर २०२४ रोजी ७,५०० रुपये भरले. त्यानंतर, अधिक नफ्यासाठी ‘एफटीपी फंडेड ट्रेडर प्रोग्राम’मध्ये सामील होण्यासाठी १.५ लाख रुपये जमा करण्यास सांगितले. खीलारे यांनी ही रक्कम जतीन प्रताप सिंग यांच्या केनरा बँक खात्यात (खाते क्र. ११००५३४९३३६१) जमा केली. पुढे, कथित नफ्याची रक्कम मिळवण्यासाठी त्यांना ३० टक्के रक्कम म्हणजेच ७,७८,१२३ रुपये भरण्यास सांगितले. यापैकी ५ लाख रुपये खीलारे यांनी टप्प्याटप्प्याने जमा केले.

दरम्यान, खीलारे यांना ‘कॅपिटल मॉन्क्स’ (https://capitalmonks.com) या प्लॅटफॉर्मवर त्यांच्या खात्यात १५ लाख रुपये दाखवण्यात आले. मात्र, नफा मिळवण्यासाठी सतत अतिरिक्त रक्कम जमा करण्यास सांगितले गेले. १४ फेब्रुवारी २०२५ रोजी विजेश बिरेन शहा यांच्या बँक ऑफ बडोदा खात्यात (खाते क्र. ०४०३०१०००२३४६६) २,७२,३४३ रुपये जमा केले. त्यानंतरही नफ्याची रक्कम मिळाली नाही. १० फेब्रुवारी २०२५ रोजी नम्रता देसाई (मोबाईल क्र. ९५९४३२६४३२) यांनी खीलारे यांना बँक खाते अॅक्टिव्हेट करण्यासाठी ४,७६,१२५ रुपये जमा करण्यास सांगितले. या सर्व प्रकारात खीलारे यांनी एकूण 20 लाख 35 हजार रुपये गमावले.
याप्रकरणी प्रिती जाधव, मानव अवस्थी, नम्रता देसाई, मान्यता कदम, अविनाश जाधव, कीर्ती मॅडम आणि ‘प्युअर प्रॉफिट’ तसेच ‘कॅपिटल मॉन्क्स’ या प्लॅटफॉर्मच्या निर्मात्यांविरुद्ध माहिती तंत्रज्ञान कायदा २००० च्या कलम ६६(सी) आणि ६६(डी), तसेच भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम ३(५), ३१८(४) आणि ३१९(२) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी तपास सुरू केला असून, आरोपींचा शोध घेतला जात आहे.

