वरिष्ठ अधिकारी करतात उंटावरून शेळ्या हाकण्याचे काम
बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी :-सुनील वर्मा
लोणार,
लोणार शहरासह तालुक्यात वारंवार वीजपुरवठा खंडित होण्याचा प्रकार वाढला आहे. त्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. वाऱ्याची झुळूक येताच वीजपुरवठा गुल होत आहे. महावितरणच्या गलथान व मनमानी कारभारामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.
कधी मेहकर येथून वीजपुरवठा खंडित झाल्याचे सांगण्यात येत आहे. सध्या मोठ्या प्रमाणात उकाडा जाणवत आहे. त्यातच वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याने नागरिकांना उकाड्याचा सामना करावा लागत आहे. तासन्तास वीजपुरवठा खंडित होत असल्याने नागरिकांची मात्र लाहीलाही होताना दिसत आहे.
शहरासह गावातील व शेतातील अनेक विद्युत तारा डोक्याला लागण्यासारख्या लोंबकळत आहेत. पण वारंवार सूचना देऊनसुद्धा जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असल्याचा नागरिकांकडून आरोप केला जात आहे. महावितरण विभागाकडून वीज बिलाची वसुली मात्र जोरात केली जाते. पण ग्राहकांना सुविधा उपलब्ध करून देता येत नाहीत ही मोठी शोकांतिका म्हणावी लागेल. या लोंबकळत असलेल्या तारा बदलण्यासाठी अनेक वेळा वरिष्ठ अधिकारी यांच्या मागणी करण्यात आली. परंतु, याकडे कानाडोळा करण्यात येत आहे. लोणार
शहर सर्व जगात प्रसिद्ध
आहे पण गावाची अवस्था दयनीय झाली असून सुद्धा याकडे लक्ष देण्यास कुणी ही तयार नाही. त्याच बरोबर वरिष्ठ अधिकारी हे उंटावरून शेळ्या हाकण्याचे काम करतात. कारण गावातील कार्यालयात उपस्थित न राहता बाहेरूनच कारभार
चालवण्याचे काम करत असल्याचे बोलल्या जात आहे. तसेच शेतात वीज पुरवठा करणाऱ्या तारांना झाडाच्या फांद्या लागून फॉल्ट झाला तर तो फॉल्ट काढण्यासाठी कर्मचारी यांना एक-दोन दिवस लागत आहेत. संबंधित अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे.
रात्रीच्या वेळी शेतात उजेड रहावा म्हणून वीज वितरण कंपनीच्या वतीने शेतात सिंगल फेजची व्यवस्था केली आहे. पण ही सेवा फक्त नावालाच उरली आहे. जर कुठे फॉल्ट झाला तर कित्येक दिवस वीजपुरवठा खंडित होतो. त्यामुळे शेतात मुला-बाळांना घेऊन राहणाऱ्या शेतमजुरांना अंधारात रात्र काढावी लागते. त्यातच सध्या वाढलेल्या उकाड्यामुळे साप, विंचू, रानडुक्कर या सारखे प्राणी रात्रीला बाहेर पडतात.त्यामुळे या रात्रीच्या वेळी खंडित्त होणाऱ्या वीज पुरवठ्यामुळे प्राण्यांपासून शेतमजुरांना धोका निर्माण झाला आहे.
उल्कानगरी पर्यटन केंद्रासाठी मंजूर झालेल्या २२० केही सबस्टेशनचे काम अनेक दिवसांपासून प्रलंबित आहे. हे काम वेळेत सुरू करून लोणारवासीयांची होणाऱ्या त्रासापासून सुटका करावी तसेच सुलतानपुर, बिबी, लोणार ग्रामीण अशा चार अभियंत्यांच्या जागा खाली आहेत. त्या सुद्धा लवकरात लवकर भरण्यात याव्या, अशी मागणी शिवछत्र मित्र मंडळाचे संथापक अध्यक्ष नंदकिशोर मापारी यांनी निवेदनाद्वारे ऊर्जामंत्र्यांकडे केली आहे.


