गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी :- आशिष लाकडे
गडचिरोली (Gadchiroli) :- मागील दोन ते तीन दिवसापासून गडचिरोली शहरात चोर्यांचे प्रमाण प्रचंड वाढले असून २ मुली व २ मुले रात्रीच्या वेळेला दुकानांचे शटर फोडून सर्रास चोर्या करीत असल्याच्या घटना उघडकिस आल्या आहेत. चोरी करतांनाचे या चोरट्यांचे दृश्य सीसीटीव्ही कॅमेर्यामध्ये (CCTV) कैद झाले आहे. त्यामुळे शहरातील व्यापार्यांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
गडचिरोली शहरात वाढले चोर्यांचे प्रमाण
शहरातील चामोर्शी मार्गावरील कृष्णा बेकरी या दुकानाचे २ मुली व २ मुलांचा समावेश असलेल्या या चोरट्यांनी शटरचे कुलूप फोडून चोरी केली. यात गल्ल्यातील १ हजार रुपये लंपास करून पळ काढला. २२ जून च्या रात्री एक मुलगा व एका मुलीने चामोर्शी मार्गावरील स्मार्ट केअर फार्मसी या दुकानाचे शटर फोडून आतमध्ये गल्ल्यात असलेली चिल्लर रक्कम लंपास केली
. त्यापूर्वी धानोरा मार्गावरील एका कॅफेमध्ये देखील या चोरट्यांनी चोरी (Robbery) केल्याची माहिती मिळाली आहे. हे चोरटे रात्रीच्या सुमारास दुकानाच्या शटर चे कुलूप तोडून चोरी करत आहेत. चोरीच्या या घटनांबाबत गडचिरोली पोलीस ठाण्यात विचारणा केली असता अद्याप गुन्हा दाखल व्हायचा असून या चोरट्यांना जेरबंद करण्यासाठी पोलीस यंत्रणा कामाला लागली असल्याची माहिती मिळाली.


