प्रतिनिधी ::- नागनाथ लांजे
अखिल भारतीय ग्राहक पंचायत अहमदपूर शहर कार्यकारिणीच्या अध्यक्ष पदी रमाकांत आरनुरे यांची निवड करण्यात आली. दिवसेंदिवस ग्राहकांचे न्याय आणि हक्क राजरोसपणे पायदळी तुडवले जात आहेत. त्यामुळे सामान्य माणूस जेरीस आलेला आहे . त्यातच वाढत्या महागाईमुळे त्यांना जीवन जगणे अवघड होत चालले आहे. ग्राहकापर्यंत दर्जेदार जीवनावश्यक वस्तू पोहोचणेही दुरापास्त झाले आहे. शाळा-कॉलेजमध्ये मोठ्या प्रमाणावर देणग्या दिल्याशिवाय प्रवेश मिळेनासे झाले आहेत.
शासकीय योजनांना भ्रष्टाचाराच्या भस्मासुरांनी वेढलेले आहे. वाढत्या ग्राहक फसवणूकीमुळे जनसामान्य माणसाचे स्वातंत्र्य धोक्यात येते की काय अशी भीती निर्माण झाली आहे. याकरिता ग्राहकांच्या हितांचे प्रश्न हाताशी घेऊन RTI आणि अखिल भारतीय ग्राहक पंचायत च्या माध्यमातून ध्येयवादी कार्यकर्ते गेले अनेक वर्षापासून सामाजिक कार्य करत आहेत. त्यामुळे समाजात लोकशिक्षण व लोक जागृतीचे कार्य वृध्दिंगत होत आहे.
या कार्यात वाढ होण्यासाठी रमाकांत आरनुरे यांच्या कामाची दखल घेऊन जिल्हा कार्यकारिणीच्या पुर्व संमतीने अहमदपूर शहर अध्यक्ष पदी निवड झाली असुन त्यांचा शाल आणि पुष्पहार घालून अखिल भारतीय ग्राहक पंचायत जिल्हा शाखा लातूरच्या वतीने जिल्हा कार्यकारिणी सदस्य शिवराज शेकडे यांनी यथोचित सन्मान केला. यावेळी जिल्हा सचिव माधव गुंडरे, अहमदपूर तालुका सचिव ज्ञानेश्वर कदम यांनी नियुक्ती पत्र देऊन अखिल भारतीय ग्राहक पंचायतचे उद्दिष्ट व ध्येय धोरणानुसार कार्य करण्यासाठी शुभेच्छा दिल्या.
शहर अध्यक्ष पदावर निवड झाल्याबद्दल जिल्हाध्यक्ष दत्तात्रय मिरकले पाटील, जिल्हा उपाध्यक्ष एन.जी.माळी आणि सर्व जिल्ह्यातील ग्राहक पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून अभिनंदन होत आहे.


