१ जुलैपासून आमरण उपोषणाचा इशारा
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-कविता धुर्वे
राळेगाव तालुक्यातील धानोरा गावात महसूल अधिकाऱ्यांच्या कामकाजातील अनियमिततेमुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे. याबाबत ग्रामस्थांनी दिनांक २२ मे २०२५ रोजी जिल्हाधिकारी यवतमाळ यांच्याकडे लेखी तक्रार सादर केली होती. मात्र, संबंधित तक्रारीवर अद्याप कोणतेही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही.
शिवानी सतोवकर मॅडम या धानोरा येथे महसूल अधिकारी म्हणून कार्यरत असल्या तरी त्या कार्यालयात हजेरी लावीत नसल्याचा ग्रामस्थांचा आरोप आहे. धानोरा हे त्यांचे एकमेव अधिस्थान असूनही त्या नियमितपणे कार्यालयात अनुपस्थित राहतात. विशेषतः १५ ऑगस्ट, २६ जानेवारी यांसारख्या राष्ट्रीय सणांनाही त्या कार्यालयात अनुपस्थित राहत असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.
तलाठी कार्यालय अस्तित्वात असूनदेखील सातबारा, ८अ उतारे, उत्पन्न प्रमाणपत्र, शैक्षणिक दस्तऐवज आदी महत्वाचे शासकीय कागदपत्रे वेळेवर न मिळाल्यामुळे ग्रामस्थांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. शेतकऱ्यांच्या कर्ज प्रक्रिया, सायबर ८अ प्रमाणपत्र, तसेच विद्यार्थ्यांना लागणाऱ्या उत्पन्न प्रमाणपत्रासाठी नागरिकांना राळेगावच्या महसूल कार्यालयाचा धाव घेणे भाग पडते. यामुळे वेळ, पैसा व मानसिक त्रास होत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
या तक्रारीवर प्रशासनाने त्वरित कारवाई न केल्यास ग्रामस्थांनी दिनांक १ जुलै २०२५ पासून आमरण उपोषण करण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे प्रशासनाने या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन त्वरित कार्यवाही करावी, अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे.


