बुलढाणा:- सुनील वर्मा…
जिल्ह्यात ११ नगर पालिकांची निवडणूक
दिवाळीत प्रचाराचा धुराळा : विजयाचे फटाके व उधळणार गुलाल
निवडणुकांतील महत्वाचा टप्पा असलेल्या प्रभाग रचनेसंदर्भात शासनाने आदेश काढले. त्यानंतर ता. १२ जून रोजी नगर चार वर्षानंतर पुन्हा जनतेचे राज्य येणार
बुलढाणा:- राज्यातील नगर पालिका निवडणुकांच्या अनुषंगाने शासनाच्या नगर विकास विभागाने प्रभागरचना आणि इतर प्रक्रियांचे वेळापत्रक जाहीर केले आहे. बुलडाणा जिल्ह्यात ११ नगर पालिकांची निवडणूक होणार असून आता राजकीय हालचालींना देखील वेग आला आहे. दरम्यान १ सप्टेंबर रोजी प्रभागरचनेची अंतीम यादी जाहीर होणार असून त्यानंतर आरक्षण सोडत, मतदार यादी प्रकाशित होईल. या सर्व निवडणुक प्रक्रियेला ऑक्टोबर पर्यंतचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे ऐन दिवाळी प्रचाराचा धुराळा उडून नंतरच गुलाल उधळला जाण्याची शक्यता आहे. मागील चार वर्षांपासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका रखडल्या होत्या. दरम्यान ६ मे रोजी सर्वोच्च न्यायालयाने येत्या ४ महिन्यात निवडणुका घेण्याचे आदेश दिले. त्यामुळे रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांचा मार्ग मोकळा झाला. त्यानंतर निवडणूक आयोगाने निवडणुकांच्या अनुषंगाने तयारी सुरू केली आहे. पालिका प्रभागरचनेचे वेळापत्रक जाहीर केले आहे.
राजकीय हालचालींना वेगः बुलडाणा जिल्ह्यात खामगाव, चिखली, सिंदखेड राजा, लोणार, बुलडाणा, देऊळगाव राजा, मेहकर, शेगाव, नांदुरा, जळगाव जामोद, मलकापूर अशा ११ नगर पालिकांची निवडणूक होवू घातली आहे.
दरम्यान निवडणूक आयोगाने तयारी सुरू केल्यानंतर आता राजकीय हालचालींना देखील वेग आला आहे. मागील काही दिवसांपासून गुडग्याला बाशिंग बांधून बसलेल्या इच्छुकांनी नागरिकांसोबत जनसंपर्क वाढवला असून सार्वजनिक कार्यक्रमांना हजेरी लावणे सुरू केले आहे. तर राजकीय पक्षांकडून मेळावे, बैठकींवर जोर दिला जात आहे.
निवडणुकांमध्ये येणार रंगतः मागील काळात राज्यात राजकीय समिकरणे बदलली असून यामुळे निवडणुकांमध्ये रंगत येणार आहे. सध्या महायुतीमध्ये भाजप, शिवसेना शिंदे गट व राष्ट्रवादी अजित पवार गट आहे तर महाविकास आघाडीत काँग्रेस, शिवसेना उद्धव ठाकरे गट व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट आहे. दरम्यान पुढील काळात यात आणखी बदल होण्याची शक्यता नाकारता येत नाही. कारण सद्या युती, आघाडीत सोबत लढण्याची भाषा नेते वापरत असले तरी स्थानिक परिस्थिती लक्षात घेऊन तसे निर्णय होवून वेगळी चूल मांडण्याचा प्रयत्न होवू शकतो. यामुळे जशा जशा निवडणुका आणखी जवळ येतील तसतशे राजकीय वातावरण तापणार असून ४ वर्ष लांबलेल्या निवडणुकांमध्ये रंगत येणार आहे.
असे आहे प्रभाग रचनेचे वेळापत्रक नगर विकास विभागाने निवडणुका संदर्भात कालबद्ध कार्यक्रमच जाहीर केला आहे. यामध्ये ११ जून ते १६ जून प्रगणक गटाची मांडणी करणे, १७ जून ते ३० जून पर्यंत प्रारुप प्रभाग रचना तयार करणे, १ जुलै ते ३ जुलै दरम्यान प्रारुप प्रभाग रचनेच्या मसुद्यावर समितीने सही करणे, ४ ते ८ जुलै दरम्यान प्रारूप प्रभाग रचनेचा प्रस्ताव राज्य निवणूक आयोगाकडे पाठविणे, १५ जुलै ते २१ जुलै दरम्यान प्रारुप प्रभाग रचना प्रसिद्ध करून त्यावर हरकती मागणे, त्यानतंर जिल्हाधिकारी यांनी प्राधिकृत केलेल्या अधिकाऱ्याने प्राप्त हरकती व सुचनांवर सुनावणी घेण्यात येईल.
२२ ते ३१ जुलै दरम्यान हा कार्यक्रम राबविण्यात येईल. १ ते ७ ऑगस्ट दरम्यान सुनावणी नंतरच्या हरकती व सुचना विचारात घेऊन अंतिम केलेली प्रभाग रचना निवडणूक आयोगास मान्यतेसाठी पाठविणे. त्यानंतर २२ ऑगस्ट ते १ सप्टेंबर दरम्यान राज्य निवडणूक आयुक्त यांनी अंतिम केलेली प्रभाग रचना अधिसुचनेद्वारे प्रसिद्ध करण्यात येणार आहे



