- विद्यार्थी संख्या घटल्याने गुलाबराव खरात यांची कठोर कारवाई जिल्हा परिषद शाळांमधील दुर्दैवी चित्र
बुलढाणा:- सुनील वर्मा…
जिल्ह्यातील काही लेंदी शिक्षकांमुळे
प्रशासकिय भवन जिल्हा परिषद बुलढाणा
जिल्हा परिषद शाळा बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. बहुतांश शाळांमध्ये विद्यार्थीसंख्या घटल्याने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाबराव खरात यांनी चिंता व्यक्त केली. कमी पटसंख्या असलेल्या शाळांचा यांडोळा घेतला असता २० शाळांची पटसंख्या १ ते १० एवढीच आढळून आल्याने सीईओंनी कारवाईची कठोर पावले उचलली. अकार्यक्षमतेचा कळस गाठणाऱ्या सुमारे ३० ते ३५ शिक्षकांच्या निलंबनाचे आदेश काढण्यात आले, तर ५० ते ६० शिक्षकांना कारणे दाखवा नोटिसा बजावण्यात आल्याची विश्वसनीय माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली. विद्यार्थी संख्या घटत चालल्याने जिल्हा परिषद शाळांचे अस्तित्व धोक्यात आले आहे.
मराठी शाळा वाचविणे व गुणवत्तेचा दर्जा टिकवून ठेवण्याकडे कार्यरत शिक्षकांचे साफ दुर्लक्ष झाले आहे. यामुळे पालक आपल्या पाल्यांना कॉन्व्हेंटमध्ये दाखल करत आहेत. परिणामी जिल्हा परिषद शाळा ओस पडण्याच्या मार्गावर आहेत. गोरगरिबांच्या मुलांना जिल्हा परिषद शाळांचाच मोठा आधार आहे. जिल्हा परिषदेच्या असंख्य शाळांमध्ये दर्जेदार शिक्षण दिले जात असल्याने विद्यार्थी घडत आहेत.
मात्र, काही शाळांमध्ये या उलट चित्र आहे. गलेलठ्ठ पगार घेऊनही काही शिक्षक गरीबांच्या पाल्यांचे नुकसान तर करत आहेतच, पण मराठी शाळा बुडविण्यासदेखील हातभार लावत असल्याची कृती केली जात असल्याचे दिसून येत आहे. वर्षानुवर्षे एकाच शाळेवर कार्यरत असलेल्या अकार्यक्षम शिक्षकांमुळे विद्यार्थी संख्येत लक्षणीय घट आल्याचे लक्षात येताच जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाबराव खरात यांनी दोषी शिक्षकांवर कठोर कारवाई सुरू केली आहे.
बुलढाणा पंचायत समितीअंतर्गत ४ शाळा, चिखली २, मेहकर २. लोणार २, खामगाव १, शेगाव १, नांदुरा ५ व मोताळा ३ अशा २० शाळांमध्ये १ ते १० च्या आतच पटसंख्या असल्याची गंभीर बाब समोर येताच गुलाबराव खरात यांनी सुमारे ३० ते ३५ शिक्षकांवर निलंबनाची कारवाई करण्याचे आदेश दिले. या आदेशावर बुधवारीच स्वाक्षरीदेखील झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्याचप्रमाणे ५० ते ६० शिक्षकांवर प्रशासकीय कारवाई केली जाणार आहे. यातील अनेकांना कारणे दाखवा नोटीसदेखील बजावण्यात आल्या आहेत.
पटसंख्या कमी असलेल्या शाळांमध्ये बुलडाणा तालुक्यातील सागवन ४, भादोला वाडी ६, हनवतखेड शाळा-२, मढ (उर्दू)-५. चिखली तालुक्यातील सावरखेड खुर्द-२, वैदुवाडी-६, मेहकर तालुक्यातील पोखरी-४, नागझरी खुर्द-६, लोणार तालुक्यातील मढी-८, रायगाव वस्ती-२, खामगाव तालुक्यातील दोंदवाडा-४, शेगाव तालुक्यातील गोळेगाव खुर्द १, नांदुरा तालुक्यातील खेडगाव ६, कोदरखेड २, हिंगणा दादगाव-३, वडगाव डिधी -६, सांगवा-१, मोताळा तालुक्यातील चिंचखेड खुर्द-६, रिधोरा-२, वाडी-५ यांचा समावेश आहे

सीईओंने अकार्यक्षम मास्तरांची भरविली शाळा
पटसंख्या कमी होण्यास कारणीभूत असलेल्या शिक्षकांना सीईओ गुलाबराव खरात यांनी जिल्हा परिषदेत बोलावून त्यांची चांगलीच कानउघाडणी केली. एकप्रकारे या शिक्षकांना चांगलाच धडा शिकविल्याची माहिती आहे. घटत्या पटसंख्येच्या प्रश्नाबाबत हे मास्तर समर्पक उत्तरे देऊ न शकल्याने त्यांच्यावर निलंबनाची कारवाई प्रस्तावित करण्यात आली.

