महाक्रांती न्यूज नेटवर्क: -प्रतिनिधी :-राज्यात मान्सूनचे आगमन तोंडावर आलेले असताना शेतकरीवर्ग गंभीर आर्थिक संकटात सापडला आहे. नैसर्गिक आपत्ती, विमा कंपन्यांचा दिरंगाईचा धोरणात्मक गैरवर्तन, बँकांचे थकीत कर्ज, आणि नवे कर्ज न मिळणे यामुळे शेतकऱ्यांचे जीवन असह्य झाले आहे. या पार्श्वभूमीवर मा. आमदार बच्चुभाऊ कडू यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या महासमाधीस्थळी ८ जूनपासून अन्नत्याग आंदोलन सुरु केले आहे.
या आंदोलनास देशातील विविध शेतकरी संघटनांचा पाठिंबा लाभत असून, महाराष्ट्र राज्य किसान सभा, ऑल इंडिया किसान सभा यांनी या लढ्याला सक्रिय साथ दिली आहे.
कॉ. सचिन मोतकुरवार (अध्यक्ष, अहेरी विधानसभा – AIKS) यांनी यासंदर्भात मा. मुख्यमंत्री यांना निवेदन पाठवत सरकारकडून तातडीने हस्तक्षेपाची मागणी केली आहे. त्यांच्या निवेदनात खालील प्रमुख मागण्या मांडण्यात आल्या आहेत:
- शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमुक्ती द्यावी.
राष्ट्रीयीकृत बँका, सहकारी संस्था, मायक्रो फायनान्स, बचत गट, व खाजगी सावकार यांच्याकडील सर्व प्रकारची कर्जे माफ करावीत. - शेतकऱ्यांना बिनव्याजी दुप्पट कर्ज द्यावे.
नाबार्ड आणि इतर वित्तीय संस्थांमार्फत शेतकऱ्यांना सहज व विनाव्याज नवे कर्ज उपलब्ध करून द्यावे. - किमान आधारभूत किंमतीसाठी (MSP) कायदा लागू करावा.
डॉ. स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी (C2+50%) अनुषंगाने शेतमालासाठी हमीभाव निश्चित करून तो कायदेशीर करावा. - पिक विमा नुकसान भरपाई तातडीने वितरित करावी.
“शेतकऱ्याला आत्महत्येच्या उंबरठ्यावर नेणाऱ्या धोरणांना सरकारने थांबवले पाहिजे. बच्चुभाऊंचे आंदोलन हे फक्त त्यांचं वैयक्तिक लढा नसून, राज्यातील प्रत्येक शेतकऱ्याचं प्रचंड वेदनांचं प्रतिक आहे,” असे मत कॉ. मोतकुरवार यांनी व्यक्त केले.
जर शासनाने तातडीने सकारात्मक निर्णय घेतला नाही, तर हे आंदोलन राज्यभर तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला आहे.


