लोहा(शुभम उत्तरवार)
लो ह्यात शिवसेना उबाठा नांदेड दक्षिण च्या वतीने फडणवीस सरकार क्या हुआ तेरा वादा आंदोलन करण्यात येऊन लोहा तहसीलदार मार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित दादा पवार, यांना निवेदन देण्यात आले.
राज्यात गेल्या अनेक महिन्यांपासून सत्तेवर आलेल्या महायुती सरकारने राज्यातील जनतेला , लाडक्या बहिणींना, शेतकऱ्यांना भूलथापा देऊन सता काबीज केली व निवडणुक संपताच दिलेल्या आश्वासनाकडे पाठ फिरवली त्यामुळे शेतकरी, कष्टकरी, लाडक्या बहिणीसह सामान्य जनतेमध्ये तीव्र संताप व्यक्त होत असल्याचे शिवसेना नांदेड दक्षिण तालुकाप्रमुख पद्माकर पाटील सावंत यांनी सांगितले.
लोहा तहसीलदार मार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांना निवेदन देण्यात आले.
पुढे निवेदनात असे नमूद केले की,
मराठवाड्यातील बांधवांच्या वतीने, आपणास हे निवेदन सादर करत आहे. आपल्या सरकारने मोठ्या गाजावाजाने जाहीर केलेल्या अनेक योजना आणि दिलेली आश्वासने आज केवळ कागदावरच राहिली आहेत. यामुळे शेतकरी प्रचंड निराशेच्या गर्तेत ढकलली गेली असून, अनेक मूलभूत समस्यांनी डोके वर काढले आहे. याबद्दल तीव्र संताप व्यक्त करत, खालील प्रमुख मुद्द्यांवर तात्काळ लक्ष देऊन कार्यवाही करावी, अशी मागणी करत आहे.
सत्ताधारी तिन्ही पक्षांनी शेतकऱ्यांना लगोलग कर्जमाफी देण्याचा गाजावाजा केला, तसेच वेळेत कर्जफेड करणाऱ्यांना प्रोत्साहन अनुदानाचा पत्ता नाही. सरकारने सरड्याला लाजवेल इतका वेगाने रंग बदलला. कर्जमाफीच्या अपेक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना आर्थिक वर्ष संपत आले असताना कर्ज भरण्यासाठी सांगून अर्थमंत्री अजित पवारांनी त्यांची क्रूर थट्टा केली. याचाच परिणाम म्हणून, गेल्या सात महिन्यांत राज्यात १००० पेक्षा अधिक शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले आहे. शेतकऱ्यांच्या मार्फत राज्याच्या तिजोरीत जाणारा जीएसटी अनुदान स्वरूपात शेतकऱ्यांना परत करण्याच्या बाता मारल्या, मात्र जीएसटी अद्याप शेतकऱ्यांच्या वाट्याला आलाच नाही. सोयाबीन आणि कापसाचे भाव पाडण्यासाठी परदेशातून हे पीक आयात करण्याचे फतवे काढले जात आहेत. शेतकरी सन्मान योजनेची रक्कम १२ हजारांवरून १५ हजार रुपये करण्याचे आश्वासन केवळ ‘बाजार गप्पा’ ठरले आहे.
शेतमाल खराब न होण्यासाठी शीतगृहे देण्याचे बोलले, पण आज पावसाने खराब झालेल्या पिकाचे नुकसानही सरकारला उघड्या डोळ्याने दिसेनासे झाले आहे.,
हमीभावाची ‘दीडपट’ भूलथाप ही शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्यासारखी आहे. उत्पादन खर्चाच्या दीडपट हमीभावाची घोषणा म्हणजे शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसण्यासारखे आहे. सरकार फक्त कागदावर आकडेवारीचा खेळ करते आणि प्रत्यक्षात अन्नदात्याला वाऱ्यावर सोडून, त्याच्या जखमेवर मीठ चोळत आहे.,
‘एक रुपयात पीकविमा’ योजनेची घोषणा करून शेतकऱ्यांची फसवणूक करण्यात आली. ती योजना आता बंद केली असून, विमा कंपन्यांनी दीड लाख कोटींपेक्षा जास्त प्रीमियम गोळा करून ५० हजार कोटींपेक्षा अधिक रक्कम स्वतःच्या खिशात घातली आहे. मात्र, शेतकऱ्यांना नुकसानीची भरपाई सोडाच, साधे पंचनामेही झालेले नाहीत. ४५ हजार गावांमध्ये पाणंद रस्ते देण्याची घोषणा केवळ कागदावरच राहिली. शेतकऱ्यांचे हाल अजूनही तसेच आहेत, कारण आश्वासनांची पूर्तता कधी होणार हे कुणालाच माहित नाही. “अन्नदाता बनेल ऊर्जादाता” ही योजना केवळ एक निव्वळ धूळफेक आहे. आजही अनेक शेतकरी लोडशेडिंगने त्रस्त आहेत. सबसिडीचे आकडे मोठे असले तरी ती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत नाही, आणि ‘ऊर्जादाता’ बनण्याऐवजी ‘अन्नदाता’ आजही अंधारातच आहे. ‘हर घर जल, हर घर छत’ या योजनांच्या माध्यमातून मोठी स्वप्ने दाखवली खरी, पण अंमलबजावणीतील त्रुटी, भ्रष्टाचार आणि दिरंगाईमुळे जनतेची घोर निराशा झाली आहे. घोषणा करून दिशाभूल करण्याऐवजी, सरकारने या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करावी, अन्यथा हे केवळ ‘जुमले’ ठरतील अशी भीती व्यक्त होत आहे.,
मराठवाडा वॉटर ग्रीड प्रकल्पाची उपेक्षा हे या सरकारचे एक मोठे अपयश आहे. २०१८ पासून ४० ते ४५ हजार कोटींचा हा प्रकल्प केवळ कागदावरच रेंगाळत आहे, तर मराठवाडा आजही टँकरच्या पाण्यावरच तग धरून आहे. निधीचा अभाव, राजकीय इच्छाशक्तीची कमतरता आणि अंमलबजावणीतील दिरंगाई यामुळे हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प केवळ घोषणांचा पाऊस ठरला असून, मराठवाड्याची तहान कायम आहे.,
असे नमूद केले.
यावेळी शिवसेना शिवसेना नांदेड दक्षिण तालुकाप्रमुख पद्माकर पाटील सावंत, युवासेनेचे लोहा -कंधार विधानसभा प्रमुख बालाजी गाडेकर, जेष्ठ शिवसैनिक बापुराव पाटील अटकोरे, प्रल्हाद कदम,अगंद उमरेकर, यांच्यासहित मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते.

