विदर्भ विभाग प्रमुख युसुफ पठाण
वन विभागाच्या “नशेडी” वृत्तीने वर्धा जिल्ह्यातील एका वयोवृद्ध शेतकऱ्याच्या जीवनाशी क्रूर खेळ खेळला आहे. 15 मार्च 2025 रोजी वन परिक्षेत्र अधिकारी अभय ताल्हन यांनी गावठी दारूच्या नशेत तीन वनरक्षकांसह एका निष्पाप वयोवृद्ध आदिवासी नामदेवराव कौरती नामक शेतकऱ्याला अमानुष मारहाण केली. हा प्रकार विधिमंडळात आमदार सुमित वानखेडे यांनी गाजवला, अट्रॉसिटी कायद्याची मागणी केली, निवेदने दिली, धरणे-आंदोलने केली, थेट वनमंत्री गणेश नाईक यांची भेट घेतली; पण वन विभाग आणि पोलिसांचा “कुंभकर्णी” कारभार जागा झाला नाही!
“आदिवासी जन सुरक्षा-आक्रोश मोर्चा”ने वर्धा गाजवला!
दि.14 मे 2025 रोजी वर्धा जिल्ह्यात “आदिवासी जन सुरक्षा-आक्रोश मोर्चा” काढून DFO मंगेश ठेंगडी आणि CCF डॉ. किशोर मानकर यांच्या विरोधात “मुर्दाबाद”च्या घोषणा गाजल्या. वृत्तपत्रांमधून हा विषय गाजला, तरी वन विभाग “नशेच्या धुंदीत” झोपलेलाच! आदिवासी विकास विभागाच्या अपर आयुक्त आयुषी सिंघ (भाप्रसे) यांनी पोलिस अधिक्षक अनुराग जैन यांच्याशी चर्चा केल्याचे सांगितले, पण न्यायाची आशा दिवसेंदिवस मावळतच चालली आहे.
चौकशी समितीचा भोंगळ कारभार, शेतकऱ्याची थट्टा!
अ.भा.आदिवासी विकास परिषदेच्या दबावामुळे वन विभागाने चौकशी समिती गठीत केली.दि. 04 जून 2025 रोजी सकाळी 11:30 वाजताच्या चौकशीसाठी वन विभागाने पीडित शेतकऱ्याला त्याच दिवशी सायंकाळी 5 वाजता पत्र पाठवले.सकाळच्या चौकशीचे पत्र सायंकाळी मिळाल्याने शेतकरी उपस्थित होईल कसा? विशेष म्हणजे, पत्रात गुन्ह्याची तारीख 15 मार्च 2025 ऐवजी 15 मे 2025 अशी चुकीची नोंद! चौकशी समितीच्या अध्यक्षांनीही हा भोंगळपणा केला. DFO मंगेश ठेंगडी यांना जाब विचारण्यासाठी कॉल केला, तर त्यांनी कॉल कट केला! मग पीडित आदिवासी शेतकऱ्याने न्याय मागायचा कोणाकडे? वन विभागाच्या या बेशुद्ध कारभारामुळे शेतकऱ्याला न्याय मिळणे दुरापास्त झाले आहे.
“स्वस्त नशापाणी सोडा, होशात या!”
अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे विदर्भ अध्यक्ष चंद्रशेखर मडावी यांनी संताप व्यक्त करत म्हटले, “वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी स्वस्त नशापाणी सोडावे, नाहीतर आदिवासी समाज तुम्हाला होशात आणेल..! आम्ही न्याय मिळेपर्यंत लढत राहू!” वन विभागाच्या नशेडी वृत्तीविरुद्ध आता तीव्र आंदोलनाची चेतावणी देण्यात आली आहे.
चंद्रशेखर मडावी विदर्भ अध्यक्ष, अ.भा.आदिवासी विकास परिषद, नवी दिल्ली

