विदर्भ विभाग प्रमुख:- युसुफ पठाण
वाहतूक पोलीस विभागाचा उपक्रम
वर्धा : ‘दररोज मोठ्या प्रमाणात अपघात वाढत आहे. अपघात वाढण्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे वाहतुकीच्या नियमाचे पालन न करणे. याकरिता एनसीसी छात्र सैनिकांनी स्वतः व आजूबाजूच्या परिसरात वाहतूक नियमाचे पालन करण्याबाबत लोकांना जागृत करणे काळाची गरज आहे, असे प्रतिपादन वाहतूक पोलीस नियंत्रण शाखेचे हेड कॉन्स्टेबल श्री. रियाज खान यांनी छात्र सैनिकांना मार्गदर्शन करताना ४ जून रोजी बापूराव देशमुख अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या सभागृहात केले.
एनसीसी युनिटचा वार्षिक प्रशिक्षण शिबिर सेवाग्राम येथे बापूराव देशमुख फाउंडेशनच्या सभागृह परिसरात सुरू असून एनसीसी छात्र सैनिकांकरिता वाहतूक नियमाचे पालन करण्याबाबत छात्र सैनिकांना कार्यशाळेच्या माध्यमातून पोलीस विभागातर्फे मार्गदर्शन करण्यात आले. वर्धा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अनुराग जैन यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संतोष शेगावकर यांच्या आदेशाने पोलीस हेड कॉन्स्टेबल श्री रियाज खान यांनी विस्तृत माहिती देऊन छात्र सैनिकांना दुचाकी वाहन चालवताना हेल्मेट परिधान करा, चार चाकी वाहन चालवताना लावा, वाहन चालवताना नियंत्रित स्पीडमध्ये चालवा, वाहतूक नियमाचे पालन करा व आपल्या परिसरातील व परिचित लोकांना वाहतूक नियमाबद्दल जागरूक करा असेही आवाहन हेड कॉन्स्टेबल रियाज खान यांनी छात्र सैनिकांना केले.

यावेळी मंचावर एनसीसी अधिकारी कॅप्टन मोहन गुजरकर, सुभेदार प्रमोद घोरपडे, सुभेदार विनोद कुमार, नायब सुभेदार हरविंदर सिंग, नायब सुभेदार जसवंत सिंग व सैन्य प्रशिक्षण देणारे प्रशिक्षक उपस्थित होते.
वाहतूक विभागाचा उपक्रम प्रशंसनीय आहे याबाबत एनसीसी चे कमान अधिकारी कर्नल समीक घोष यांनी प्रशंसा करून पोलीस विभागाचे आभार मानले. यावेळी प्रशासकीय अधिकारी लेफ्टनंट कर्नल नवनीत थापा व सुभेदार मेजर दिलबाग सिंग उपस्थित होते.

