लातूर जिल्हा प्रतिनिधी मोहसीन खान
लातूर : श्री क्षेत्र चाकरवाडी येथील सदगुरु संत श्री ज्ञानेश्वर माऊली महाराज यांच्या 25 व्या पुण्यस्मरणार्थ आणि आंतरराष्ट्रीय शिवकथा प्रवक्ते पं . प्रदीप मिश्रा ( सिहोरवाले ) यांच्या कथेच्या अनुषंगाने प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षीही लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सर्व घटकांच्या वतीने एकूण 24 लाख 08 हजार रुपयांचे अन्नधान्य दोन ट्रकच्या माध्यमातून चाकरवाडीला रवाना करण्यात आले. लातूर ग्रामीणचे माजी आमदार वैजनाथ शिंदे, लातूर बाजार समितीचे सभापती जगदीश बावणे,उपसभापती सुनील पडिले आणि मान्यवरांच्या हस्ते या ट्रकचे विधिवत पूजन करण्यात आले.
या उपक्रमात लातूर बाजार समितीमधील सर्व आडते, गुमास्ते, हमाल – मापाडी, गाडीवान अशा सर्व घटकांचा हिरिरीने सहभाग असतो. स्व. पांडुरंगजी लोया यांच्या प्रेरणेने मागच्या सलग 30 वर्षांपासून हा उपक्रम अविरतपणे सुरु आहे. यावर्षी ज्ञानेश्वर माऊली महाराजांचे 25 वे पुण्यस्मरण आहे. त्यानिमित्त भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताह , श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी तसेच पं . प्रदीप मिश्रा ( सिहोरवाले ) यांची श्री शिवमहापुराण कथा दि. 8 जून ते दि. 14 जून 2025 या कालावधीत होणार आहे. या सोहळ्यासाठी लाखोंच्या संख्येने भाविक भक्त चाकरवाडी येथे येणार आहेत. त्याकरिता महाप्रसादाची एक दिवसाची सेवा लातूर बाजार समितीमधील सर्व आडते, गुमास्ते, हमाल – मापाडी, गाडीवान अशा सर्व घटकांकडून दिली जाणार आहे. यावेळी आपले विचार व्यक्त करताना माजी आमदार वैजनाथ शिंदे यांनी लातूरच्या आडत व्यापारी आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येणार हा उपक्रम अतिशय चांगला आहे. मागच्या 30 वर्षांपासून चालत असलेला हा अन्नसेवेचा पायंडा यापुढील काळातही असाच अखंडितपणे चालू रहावा , अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. आडत व्यापारी सुधीर गोजमगुंडे यांनी यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना या अन्नसेवेसंदर्भातील सर्व माहिती देऊन याकामी सहकार्य करणाऱ्या सर्व बांधवांचे त्यांनी आभार मानले.
या कार्यक्रमाचे विस्तृत प्रास्ताविक अशोक ( गट्टूसेठ ) अग्रवाल यांनी केले. प्रास्ताविकात त्यांनी यावर्षी एकूण २४ लाख ८ हजार रुपयांचा निधी संकलित झाला असून त्यातून 601 तेल डब्बे, 46 कट्टे साखर, 55 कट्टे तूरडाळ, 185 कट्टे चणाडाळ , गहू – तांदुळ आदी सामग्री पाठवण्यात येत असल्याचे सांगितले. ज्ञानेश्वर माऊली महाराजांचा कृपाशिर्वाद लातूर बाजार समितीतील सगळ्यांवर राहिला आहे. प्रत्येक व्यक्तीने एकदा तरी चाकरवाडीला भेट देऊन माऊलींच्या संजीवन समाधीचे दर्शन घ्यावे असे आवाहनही अग्रवाल यांनी केले. याप्रसंगी लातूर बाजार समितीच्या सर्व संचालकांसह सचिव अरविंद पाटील, सहसचिव सतीश भोसले, सीए प्रकाश कासट , चंद्रकांत पाटील , रामविलास लोया, अशोक लोया, तुळशीराम गंभीरे , हरिकिशन मालू, अॅड. भालचंद्र पुरी, नवनाथ कवितके , दिगंबर माळवदे, देविदास गायकवाड, बालाजी जाधव, लालूशेठ कचोळीया, आनंद मालू, निवृत्ती ढवळे , अमर पवार, श्रीनिवास टाकळीकर, हर्षवर्धन सवई , पाडुळे, बसवराज चवळे , प्रल्हाद सुरवसे, राजकुमार मुंदडा, सुधीर बोरुळे , संजय माने, गुलाब मोहिते, नितीन कोरे, दिनकर मोरे यांसह अनेक आडत व्यापारी, गुमास्ता – मापाडी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन रमेश सूर्यवंशी यांनी तर आभार प्रदर्शन बालाप्रसाद बिदादा यांनी केले.

