बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी सुनील वर्मा
बुलढाणा जिल्ह्यातील मौजे देऊळघाट येथे गेल्या काही महिन्यांपासून खुलेआम आणि बेधडक पद्धतीने अवैधरित्या देशी दारू विक्री सुरू असून, या विरोधात ठोस कारवाई होत नसल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप आहे.
अनेक वेळा स्थानिक पोलिसांना तक्रारी करूनही दुर्लक्ष केल्याने सामाजिक कार्यकर्ते रिजवान खान उस्मान खान यांनी गावकऱ्यांसह २६ मे २०२५ रोजी जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयासमोर आमरण उपोषणाला सुरुवात केली.
या उपोषणाच्या पार्श्वभूमीवर दिलेल्या निवेदनात रिजवान खान यांनी नमूद केले आहे की, देऊळघाट हे मोठी लोकसंख्या असलेले गाव असून गावातून राज्य महामार्ग जातो. त्यामुळे येथे वर्दळ कायम असते. अशा ठिकाणी गावातील विविध लहान-मोठ्या दुकानांमधून खुलेआम अवैध देशी दारू विक्री होत असून पोलिस प्रशासन याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे.
अधिक चिंतेची बाब म्हणजे, या अवैध विक्रेत्यांकडून खुलेआम सांगितले जात आहे की, “बीट जमादार व वरिष्ठ अधिकाऱ्यांना हप्ते देतो, त्यामुळे कोणी आमचे काही करू शकत नाही.” या बिनधास्तपणामुळे त्यांचे मनोबल दिवसेंदिवस वाढत चालले असून, गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गावात अधिकृत देशी दारू विक्रीचे एकही परवानाधारक दुकान नसताना, पोलिस प्रशासनाने या अवैध धंद्यांना पाठीशी घालणे ही अत्यंत गंभीर बाब आहे.
“यापुढेही पोलिस प्रशासनाने योग्य ती कारवाई केली नाही, तर हे आमरण उपोषण तीव्र आंदोलनात रूपांतरित केले जाईल,” असा इशाराही कार्यकर्ते रिजवान खान यांनी दिला आहे.

