(मनसेचे तहसीलदारांना निवेदन, आष्टोना ग्रामवासी सह कित्येक ग्रामवासी दोन महिन्यांपासून बघत आहेत पिक कर्जाची वाट)
राळेगाव तालुका प्रतिनिधी :- कविता धुर्वेT
शेतकऱ्यांना शेती करण्यासाठी सोईस्कर जावे म्हणून शासनाकडून बिनव्याजी कर्ज शेतकऱ्यांना बँकामार्फत दिले जाते. मात्र माननीय जिल्हाधिकारी साहेब यांचे कडुन आदेश असतांनाही व खरीप हंगाम सुरू झाला असतांना सुद्धा राळेगाव तालुक्यातील काही बँका मुद्दाम शेतकऱ्यांना पीक कर्ज देण्यास विलंब करीत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना बी-बियाणे , खते व शेतीपयोगी साहित्य खरेदी करण्यासाठी खाजगी सावकारांकडे हात पसरावे लागत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना बँकामार्फत लवकर पीक कर्ज देण्यात यावे तसेच पीक कर्ज देण्यास विलंब करणाऱ्या बँक व शाखा व्यवस्थापकावर तसेच सहकारी संस्थेच्या सचिवावर कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी राळेगाव तालुका मनसेच्या वतीने करण्यात आली.
सततच्या नापिकीमुळे शेतकरी आधीच मेटाकुटीस आला असतांना नवीन पीक कर्ज मिळण्यासाठी सर्वसामान्य शेतकऱ्यांनी खासगी सावकारांकडून अंदाजे ५ टक्के किंवा त्यापेक्षा जास्त व्याजाने पैसे काढून बँकांचे जुने कर्ज फेडले कारण नवीन कर्ज लवकर मिळाले की सावकारांचे कर्ज फेडायचे व उरलेल्या पैशात शेती करायची असा शेतकऱ्याचा कयास असतो. परंतु बँकाचे कर्ज ३१ मार्चपर्यंत भरूनही राळेगाव तालुक्यातील काही गावांना अजून पर्यंत पिक कर्ज मिळाले नाही. असाच प्रत्यय वडकी सर्कलमधील भरपूर गावात तसेच आष्टोना गावातील शेतकरी सह कित्येक गावातील शेतकऱ्यांना आला. या गावच्या शेतकऱ्यांनी ३१ मार्चपूर्वी कर्ज फेडले परंतु आज दोन महिने उलटूनही तीसरा महिना सुरू होउन राहीला तरी या गावातील शेतकऱ्यांना पीक कर्जाचे वाटप झाले नाही.
पीक कर्ज मिळण्यास उशीर झाला की खासगी सावकारांचे तेवढेच जास्त व्याज वाढणार. आधीच खाजगी सावकारांचे व्याज अव्वाच्या सव्वा असते. त्यात उशीर झाला की खासगी सावकारांचे तेवढे जास्त व्याज वाढणार. उशिरा कर्ज मिळाल्यावर शेतकऱ्यांना खाजगी सावकार्यांचे कर्ज फेडून किती पैसे उरणार व त्यात शेती करायची कशी हा मोठा प्रश्न आहे.
तरी मा. तहसीलदार साहेबांनी या प्रकरणात लक्ष घालून संबंधित बँकावर व तक्ता तयार करणाऱ्या सहकारी संस्थेच्या सचिव आवर या प्रकरणात योग्य ती कार्यवाही करावी व गोरगरिबांच्या कैवारी सामान्य शेतकरी यांना न्याय मिळवून द्यावा अशी मागणी निवेदनाद्वारे मनसेच्या वतीने उपजिल्हाध्यक्ष शंकर वरघट यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. यावेळी तालूका सरचिटणीस रोशन गुरूनुले सह असंख्य शेतकरी उपस्थित होते.
खाजगी सावकाराकडून अव्वाच्या सव्वा व्याजदराने कर्ज काढून शेतकऱ्यांनी बँकेचे कर्ज फेडले व जिल्हाधिकारी साहेब यांचे लवकर पीककर्ज देण्याचे आदेश असतांनाही बॅंकांकडून कर्ज वाटपात विलंब होत आहे. याचा अर्थ असा की खाजगी सावकार, बँक व सहकारी संस्थेचे सचिव यांच्यात काही तरी नक्कीच साटेलोटे आहे आणि असे आढळल्यास मनसेच्या स्टाईलने त्यांचा समाचार घेऊन शेतकऱ्यांना त्वरित पीक कर्ज उपलब्ध करून देईल
शंकर वरघट
मनसे उपजिल्हाध्यक्ष यवतमाळ

