शिरुर् तालुका प्रतिनिधी:- सचिन दगडे…
पुणे – अहिल्यानगर महामार्गाचे रुंदीकरण व उड्डाणपुलांचे प्रश्न मार्गी लावून हा महामार्ग वाहतूक कोंडीमुक्त करण्याचे आव्हान शिरुर-आंबेगाव व शिरुर-हवेलीच्या नवनिर्वाचित आमदारांसमोर उभे आहे.या कामाचा पाठपुरावा करुन हे काम लवकरात लवकर सुरु करण्यासाठी प्रयत्नशील राहिल्यास पुणे-अहिल्यानगर महामार्गावरील वाहतुक कोंडीतुन प्रवाशांची व रांजणगाव औद्योगिक वसाहतीमधील कामगारांची सुटका होईल.
पुणे-अहिल्यानगर या महामार्गांच्या कामाबाबत आजपर्यत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांसह अनेक नेत्यांनी केवळ घोषणाच केल्याचे दिसत आहे. गेल्या पंधरा वर्षात या रस्त्यावर डागडुजी, मलमपट्टी, साईडपट्ट्या व्यतिरिक्त काहीही काम झालेले दिसत नाही.
2005 साली बांधा, वापरा व हस्तांतर करा या तत्कालीन सरकारच्या धोरणानुसार या रस्त्याचे काम करुन पथकर वसुली करण्यात आली. मात्र 2010 साली या पथकर वसुली विरोधात शिरुर तालुक्यातील सामाजिक संघटनांनी जेष्ठ समाजसेवक आण्णा हजारे यांच्या मार्गदर्शनानुसार आंदोलन करुन तत्कालीन सरकारची चाललेली पथकर वसुली 2013मध्ये बंद पाडली होती. पथकर नाका बंद झाला तेव्हा या नाक्यांवरती दररोज तेरा ते पंधरा लाखांची पथकर वसुली होत होती. ती बंद झाल्यावर सरकारने या रस्त्याच्या विस्ताराकडे व विकासाकडे दुर्लक्षच केल्याचे दिसून येते.
पुण्याच्या बाहेर जाणारे पुणे-नाशिक, पुणे-सोलापुर, पुणे-सातारा, पुणे-मुंबई हे रस्ते कसल्याही अडथळ्याविना तयार होतात. मग शासनाचा पुणे-अहिल्यानगर या रस्त्यासाठी दुजाभाव का? पुणे-अहिल्यानगर महामार्गावरील पथकर नाके बंद झाल्यावर राज्यातील बहुतांश पथकरनाके बंद झाले आहेत.
दरम्यान, शिरुर-आंबेगावचे आमदार दिलीप वळसे पाटील व शिरुर-हवेलीचे आमदार ज्ञानेश्वर कटके यांनी या पुणे- अहिल्यानगर महामार्गांच्या रुंदीकरणासाठी व उड्डाणपुलासाठी पाठपुरावा करुन हा महामार्ग वाहतूककोंडी मुक्त करावा अशी मागणी जनतेतून केली जात आहे.


