वर्धा विभाग प्रतिनीधी- इम्रान् खान
वर्धा:-चौपाटी परिसरात उभ्या असलेल्या महिलेकडे बोलण्यासाठी मोबाईल मागून तिचा मोबाईल हिसकावून चोरून नेला, तोच मोबाईल इतवारा बाजार परिसरात विकायला आणल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी तत्काळ इतवारा परिसर गाठून अट्टल मोबाईल चोरट्याला बेड्या ठोकल्या. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली असून, पोलिसांनी दुचाकीसह ९५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करत गुन्ह्याची उकल केली.नीलेश नामदेवराव पाटील (२४, रा. रसुलाबाद) असे अटक केलेल्या चोरट्याचे नाव आहे. एक महिला रामनगर परिसरात असलेल्या शंकर सुपर शॉपीजवळील चौपाटी परिसरात थांबलेली असताना तेथे अज्ञात व्यक्ती दुचाकीने आला आणि महिलेला मला मोबाईल द्या, थोडं बोलायचे आहे, असे म्हणाला. महिलेने त्याला मोबाईल दिला असता,
चोरट्याने मोबाईल घेऊन दुचाकीवरुन पळ काढला. या प्रकरणाची तक्रार रामनगर पोलिस ठाण्यात दाखल केली त्या होती. पोलिसांनी अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल केला होता.गुन्ह्याचा स्थानिक गुन्हे शाखेकडून समांतर तपास सुरू असतानाच २९ रोजी पोलिसांना एक लाल रंगाचे शर्ट घालून असलेला व्यक्ती इतवारा बाजार परिसरात दुचाकीने मोबाईल विकण्यासाठी फिरत असल्याची गोपनीय माहिती मिळाली. ही माहिती मिळताच मोबाईल चोर नीलेश याला ताब्यात घेत पोलिसी हिसका दाखवताच त्याने हा मोबाईल रामनगर येथील चौपाटी परिसरातून चोरल्याचे सांगितले. चोरट्याच्या ताब्यातून (एमएच ३२, एटी २३०५) क्रमांकाची दुचाकी आणि मोबाइल असा एकूण ९५ हजारांचा मुद्देमाल जप्त केला.ही कारवाई पोलिस निरीक्षक विनोद चौधरी यांच्या निर्देशात पोलिस उपनिरीक्षक प्रकाश लसुंदे, हमीद शेख, श्रीकांत खडसे, सचिन इंगोले, राजेश तिवसकर, प्रमोद पिसे, रामकिसन इप्पर, उदय सोळुंकी, मुकेश ढोके यांनी केली.



