पुणे विभाग प्रतिनिधी: सचिन दगडे पुणे:- पुणे येथील बैलगाडा मालक पंडीत जाधव यांचे अपहरण करून खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. आरोपींनी पंडीत जाधव यांचा खून केल्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी त्यांचा मृतदेह जाळून त्याची विल्हेवाट लावली.त्यानंतर त्यांचे अपहरण खंडणीसाठी झाल्याचे बनाव रचला. खंडणी विरोधी व औद्योगिक तक्रारी निवारण पथक गुन्हे शाखेने आरोपीला ताब्यात घेऊन हा गुन्हा उघडकीस आणला आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक देवेंद्र चव्हाण यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाणे हद्दीतून पंडीत रामचंद्र जाधव (वय 52 वर्षे रा.मु. जाधववाडी डॅमजवळ, पो.नवलाख उंब्रे ता.मावळ) हे दिनांक १४ नोव्हेंबर २०२४ पासून बेपत्ता आहेत. अज्ञात व्यक्तीने त्यांच्या नातेवाईकांकडे पंडीत जाधव यांच्या व्हाटसअॅपवर नंबरवरुन ५० लाख रुपयांची मागणी केली आहे. ही माहिती प्राप्त झाल्याने याबाबत वरिष्ठ अधिकारी यांना कळवून वरीष्ठ पोलीस निरीक्षक देवेंद्र चव्हाण, पोलीस उप-निरीक्षक सुनिल भदाणे आणि त्यांच्या स्टाफने तळेगाव एमआयडीसी परीसरात जाऊन तक्रारदार व त्यांचे नातेवाईक यांची भेट घेतली.त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार आरोपी व्यक्ती हा पंडीत जाधव यांच्या मोबाईलमधील व्हाटसअॅपवरुन पैश्याची मागणी करीत होता. पोलिसांनी पंडीत जाधव यांच्या बंद मोबाईल नंबरचे तांत्रिक विश्लेषण करून तसेच परीसरातील सीसीटीव्ही कॅमेरे चेक केले. यासह बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीवरून सुरज वानखेडे याच्या हालचाली संशयास्पद असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार गुन्ह्यातील आरोपीचे नाव निष्पन्न करुन आरोपी सुरज मच्छिंद्र वानखेडे (वय २३ वर्षे, सध्या रा. पंडीत जाधव यांच्या खोलीत, मु. जाधववाडी, पो. नवलाख उंब्रे, ता. मावळ) याला तो गावी पळून जाण्याच्या तयारीत असताना बधलवाडी नवलाख उंब्रे (ता. मावळ) येथून ताब्यात घेतले.त्याच्याकडे केलेल्या चौकशीवरुन त्याने स्वतः व त्याचा मित्र रणजीत कुमार (रा. बिहार) याच्या मदतीने प्रसिध्द गाडा मालक पंडीत रामचंद्र जाधव (वय ५२ वर्षे) यांचे ५५ लाख रूपयाची खंडणी मागितल्याचा बनाव करुन अपहरण केले. त्यांचा दिनांक १४ नोव्हेंबर २०२४ रोजी रात्री तळेगाव एमआयडीसी परिसरात वैयक्तिक कारणावरून दोरीने गळा आवळून खून केला.पंडीत जाधव यांची फॉर्चुनर गाडी ही पंडीत जाधव यांनी मागितली असल्याचे कुटुंबीयांना भासवून त्याच गाडीमध्ये मयत पंडीत यांचा मृतदेह टाकुन त्यांच्या मृतदेहाचा वहागाव (ता. खेड) येथील डोंगरावर मृतदेह जाळुन विल्हेवाट लावली. त्यानंतर गाडी पुन्हा मयत पंडीत जाधव यांच्या घराच्या परीसरात लावल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.खंडणी विरोधी पथकाकडून हा गंभीर स्वरुपाचा गुन्हा उघड करण्यात आला असून आरोपीकडून गुन्ह्यात वापरलेले पाच सिमकार्ड व दोन मोबाईल जप्त करण्यात आले आहे. नमुद गुन्ह्यात खून करुन पुरावा नष्ट करणे याप्रमाणे कलम लावण्यात आले असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास तळेगांव एमआयडीसी पोलीस ठाणे करत आहे.सदरची कारवाई पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, सह आयुक्त डॉ. शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त वसंत परदेशी, पोलीस उप आयुक्त गुन्हे संदिप डोईफोडे, सहा. पोलीस आयुक्त गुन्हे-२ बाळासाहेब कोपनर, सहा. पोलीस आयुक्त गुन्हे-१ डॉ. विशाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली, खंडणी विरोधी व औद्योगिक तक्रारी निवारण पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक देवेंद्र चव्हाण, पोउपनि सुनिल भदाणे, हवा सुनिल कानगुडे, प्रदिप पोटे, किरण काटकर, प्रदिप गोंडाबे, किशोर कांबळे, किरण जाधव, अशिष बोटके, जाधव, व तांञिक विश्लेषन विभागाचे नागेश माळी व पोपट हुलगे यांचे पथकाने केली आहे.

