वर्धा विभाग प्रतिनीधी: – युसूफ पठाण
१ जुलै २०२३ रोजी समृद्धी महामार्गावर झालेल्या विदर्भ ट्रॅव्हल्सच्या भीषण अपघाताच्या जखमा अजूनही ताज्या आहेत. या दुर्घटनेला २० महिने उलटूनही शासनाने दिलेली आश्वासने पूर्ण न केल्याने पीडित कुटुंबे न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत. मृतांच्या नातेवाईकांनी चंद्रशेखर मडावी यांच्या नेतृत्वाखाली ७ मार्च २०२५ रोजी सिंदखेडराजा हद्दीतील समृद्धी महामार्ग वरील घटनास्थळी एकत्र येत मृतकांना श्रद्धांजली वाहिली व शासनाचा निषेध नोंदवला.

या अपघातात २५ निष्पाप जीव होरपळून खाक झाले होते. मृतांच्या नातेवाईकांना २५ लाख रुपयांची मदत देण्याचे आश्वासन असंख्य प्रसारमाध्यमांपुढे शासनाने दिले होते. मात्र, आजतागायत त्याची पूर्तता झालेली नाही. तसेच, अपघाताच्या चौकशीसाठी नेमलेल्या समितीचा अहवालही अद्याप गुलदस्त्यात आहे, दोषींवर कारवाई करण्यासही शासन टाळाटाळ करत असल्याचा आरोप मृतांच्या नातेवाईकांनी केला आहे.
न्यायासाठी पीडित कुटुंबे गेल्या २० महिन्यांपासून संघर्ष करत आहेत. वर्धा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर १०४ दिवस साखळी उपोषण केले, नागपूर येथेही आंदोलन केले. मात्र, शासनाने दखल न घेतल्याने अखेर पीडित कुटुंबे सिंदखेडराजा येथे समृद्धी महामार्ग वर घटनास्थळी एकत्र आली.
पोलिस ठाण्यात जळालेल्या अवस्थेत असलेली विदर्भ ट्रॅव्हल्स पाहून मृतांच्या नातेवाईकांचा आक्रोश अनावर झाला. या अपघातात कुटुंबातील कर्ते तरुण/तरुणी गमावल्याने अनेक कुटुंबे निराधार झाली आहेत. शासनाने तातडीने विशेष बाब अंतर्गत आर्थिक मदत देऊन दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी पीडितांनी केली आहे.
या आंदोलनात सिंदखेडराजा येथील सामाजिक कार्यकर्ते संदीप मेहेत्रे यांच्यासह मृतांच्या कुटुंबातील सदस्यांनी सहभाग घेतला. आंदोलनात निलिमा खोडे, वंदना बुधबावरे, प्रिया जानवे, निलु तायडे, कल्पना गुप्ता, सीमा गोठे, गुंफा राऊत, कांचन पंधरे, योगिता खेलकर, संजय गुप्ता, दिनकर खेलकर, देवदास अगडे, शंकर गोठे, अजय जानवे, हर्षद पाते, अनिल पोखरे, परिणीत वनकर, ऋषी सायरे, रितीक गुप्ता यांचा समावेश होता. शासनाने या अधिवेशनात पीडितांना न्याय द्यावा, अशी मागणी सर्व स्तरांतून होत आहे.
आंदोलनातील प्रमुख मागण्या:
- मृतांच्या नातेवाईकांना पोर्षे कार अपघात पीडित प्रमाणे तातडीने विशेष बाब अंतर्गत आर्थिक मदत द्यावी.
- अपघाताच्या चौकशी समितीचा अहवाल सार्वजनिक करावा.
- अपघातास जबाबदार असलेल्या दोषींवर कठोर कारवाई करावी.
- समृद्धी महामार्गावरील अपघात रोखण्यासाठी उपाययोजना कराव्यात.

