वर्धा विभाग प्रतिनीधी: – युसूफ पठाण
कारंजा :- महिला दिनाच्या निमित्ताने सनशाईन स्कुल, कारंजा येथे विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. प्राथमिक आणि माध्यमिक विभागातील विद्यार्थ्यांनी या उपक्रमांत मोठ्या उत्साहाने भाग घेतला.
कार्यक्रमाची सुरुवात विशेष समारंभाने झाली, जिथे विद्यार्थ्यांनी “माझी आई, माझा स्वाभिमान” या विषयावर मनोगत व्यक्त केले. विद्यार्थ्यांनी आपल्या आई, आजी आणि महिला शिक्षकांसाठी धन्यवाद कार्ड तयार करून त्यांना समर्पित केली तसेच, वक्तृत्व स्पर्धा, “मी कोण आहे?” खेळ, रांगोळी स्पर्धा आणि “Passing the Mic” यांसारख्या विविध उपक्रमांमध्ये विद्यार्थ्यांनी हिरीरीने भाग घेतला. विशेषतः राणी लक्ष्मीबाई आणि कल्पना चावलासारख्या महान महिलांच्या कथा ऐकून विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळाली.
कार्यक्रमाच्या शेवटी बॅज आणि रिबिन समारंभात मुलांनी महिला शिक्षक व विद्यार्थिनींना सन्मानित केले. शाळेचे मुख्याध्यापक प्रेम महिले यांनी आपल्या मनोगतातून महिला सशक्तीकरण आणि शिक्षणाच्या भूमिकेवर प्रकाश टाकला.
या संपूर्ण कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये महिलांबद्दल आदर आणि प्रेरणा निर्माण झाली असून, महिला दिनाचा उत्सव शाळेत सार्थक आणि संस्मरणीय ठरला.
यशस्वीतेकरीता सर्व शिक्षिका व शिक्षक वृंदानी अथक परिश्रम केले.

