भंडारा प्रतिनीधी: – प्रितम कुंभारे
आयुष्य जगत असताना आपण यशाची कारणे फारशी शोधत नाही. परंतु अपयशाची कारणे फार शोधली जातात. अपयशाचे खापर हे नेहमी परिस्थिती वर फोडले जाते. आपल्याला काही करता आले नाही किंवा आपण अपयशी झालो की, “माझी परिस्थिती नव्हती हो” किंवा “परिस्थिती इतकी भयानक होती की” असे उद्गार ऐकू येतात. अपयशी माणसे अपयशाचे खापर स्वतः ऐवजी परिस्थितीवर फोडतात आणि मोकळे होतात. खरे तर परिस्थिती माणसाला घडवत ही नाही आणि बिघडवतही नाही. माणूसच परिस्थितीला घडवतो आणि माणूसच परिस्थितीला बिघडवतो. आपण कोणत्या नजरेने परिस्थिती कडे बघतो हे मात्र महत्वाचे.

आलेली वेळ, काळ संकट ही निघुन जातात म्हणुन हतबल होऊन बसण्यापेक्षा ही वेळ काळ संकट यातुन कसा मार्ग काढता येईल याचा विचार करणे आपण सोडूनच दिले. काही नवीन करायचे असेल की आमची परिस्थिती नाही म्हणुन आम्ही काही करू शकत नाही. असे बोलणाऱ्यांची संख्या मात्र वाढतच आहे. किशोर वयीन वयातील मुले प्रेम करताना परिस्थिती बघत नाही. प्रेम करायसाठी परिस्थिती असते मात्र स्वतःच्या उज्वल भविष्यासाठी अभ्यास करायसाठी त्यांची परिस्थिती नसते. आज या आधुनिक तंत्रज्ञानाचा काळात सर्वांकडे मोबाईल नावाचे यंत्र आहे. परंतु त्यातुन चांगले घेणारे फार कमी आहे. मग जे अपयशी होतात ते पुन्हा परिस्थितीला दोष देतात. आणि हातावर हात ठेऊन शांत बसतात. खर तर काहीतरी करायचं, आपण काहीतरी करु शकतो असे विचार आजची युवा पिढी करताना दिसतच नाही. आणि एकदा वेळ निघुन गेली की पुन्हा परिस्थितीला दोष देतात.
अरे ज्या व्यक्तीची पुस्तक विकत घेण्याची आर्थिक परिस्थिती नव्हती आज त्या व्यक्तीला विश्वरत्न हा किताब बहाल झालेला आहे. आणि आपण परिस्थिती नाही,, अमुक नाही,, तमुक नाही म्हणुन बोंबा मारत फिरतो. जरा विचार करा, काय आणि कशी होती आर्थिक परिस्थिती डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची? डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे परिस्थितीवर मार करत स्वतःच चालते – बोलते ज्ञानपीठ झाले. खर तर कठीण परिस्थिती ही कोणालाच चुकली नाही. जे परिस्थितीचा सामना करतात तेच परिस्थिती बदलवितात आणि जे परिस्थितीचा सामना करत नाही ते परिस्थितीला दोष देतात. आपल्या समाजात या दोन्ही विचारांची लोक आहेत आणि आपली सर्वात मोठी चुक की आपण जे अपयशी झाले आहेत त्यांना सल्ला विचारतो आणि ते लोक परिस्थिती नव्हती म्हणून आपल्याला सांगतात आणि आपण सुद्धा वैचारिक दृष्ट्या विचार करतो आपली पण परिस्थिती नाही मग आपण कशाला!!! असे विचार करणारी आजची युवा पिढी कोणासाठी आदर्श ठरूच शकणार नाही.
आज युवा पिढीला व्यसन करायला परिस्थिती आडवी येत नाही मात्र मेहनत करून काही तरी वेगळं करायचं असेल तर मात्र परिस्थिती आडवी यायला सुरुवात होते खर तर ही परिस्थिती काल्पनिक दृष्ट्या सक्षम करण्याची जिद्द आजच्या युवा पिढी मध्ये नाही. आणि त्यामुळे मिळालेल्या संधीच सोन आणि बिकट परिस्थितीची सुधारणा करुन आपल्यातील सर्वोत्तम गुण आपण बाहेर काढू शकत नाही. परिस्थिती जेवढी बिकट असेल तेवढेच तिखट आपण असायला पाहिजे. तरच आपण आपल्या उपजत क्षमतांचा वापर करु शकतो…
म्हणुन लक्षात असू द्या,,, घडायचं असेल,,, तर लढावच लागेल.!!!
प्रा. प्रितम माकोडे
इंदुताई मेमोरियल हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय
हरदोली (झं.) ता. मोहाडी जि. भंडारा

