अकोला विभाग प्रतिनिधी इम्रान खान सरफराज खान
शिक्षकांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष बेमुदत आंदोलनाचा इशारा
अकोला : शालेय शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांच्या अध्यक्षतेखाली नाशिक येथे झालेल्या शिक्षक संघटनांच्या बैठकीत ठरल्याप्रमाणे सन २०२४-२५ साठी संचमान्यता अद्याप दिली गेलेली नाही. प्रत्यक्षात दहापेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांमध्ये नियमित शिक्षक देण्याचा निर्णय झालेला असतानाही पोर्टलवर चुकीची संचमान्यता दिसत आहे. तसेच सहावी ते आठवीच्या वर्गाची पटसंख्या २० पेक्षा कमी असलेल्या शाळांमध्ये शून्य शिक्षक दर्शविले जात असल्याने अनेक पदवीधर शिक्षक अतिरिक्त ठरत आहेत. त्यामुळे शिक्षक संघटना या अन्यायकारक धोरणाविरोधात आक्रमक झाल्या आहेत.
या संदर्भात महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक मध्यवर्ती संघटना, महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद, प्रहार शिक्षक संघटना, महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना, प्राथमिक शिक्षक समिती, प्राथमिक शिक्षक प्रतिनिधी सभा राज्य प्राथमिक शिक्षक संघ, स्वाभिमानी प्राथमिक शिक्षक संघ, पुरोगामी शिक्षक संघटना आणि शिक्षक आघाडी या संघटनांनी एकत्र येत २० फेब्रुवारी रोजी शिक्षण आयुक्तांना निवेदन सादर केले.
यासोबतच अकोला जिल्हा परिषदेतील शिक्षकांच्या पदोन्नतीचा प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित असून प्रशासनाकडून वारंवार केवळ आश्वासने दिली जात आहेत. अनेक शिक्षकांना पदोन्नती मिळण्यापूर्वीच सेवानिवृत्त व्हावे लागले असून काही शिक्षक त्याच मार्गावर आहेत. त्यामुळे येत्या ८ दिवसांत पदोन्नती आदेश जारी करावेत अशी मागणी संघटनांनी केली आहे.
७०० हून अधिक शिक्षकांना अद्यापही वेतनवाढ नाही !
७०० हून अधिक शिक्षकांना निवडश्रेणी मंजूर होऊनही अद्याप वेतनवाढ मिळालेली नाही. प्रशासनाच्या उदासीनतेमुळे शिक्षकांमध्ये तीव्र नाराजी आहे. या दोन्ही मागण्या २८ फेब्रुवारी २०२५ पूर्वी पूर्ण न झाल्यास शिक्षक संघटनांच्या वतीने कुटुंबासह बेमुदत साखळी उपोषण छेडले जाईल असा इशारा देण्यात आला आहे. या आंदोलनामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान झाल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी प्रशासनावर असेल असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

