कैलासराजे घरत खारपाडा पेण प्रतिनीधी
प्रेक्षकात बसून दुसऱ्यासाठी टाळ्या वाजविण्यापेक्षा स्वतः मान्यवर होऊन, दुसऱ्यांना टाळ्या वाजविण्यास उद्युक्त करा.” असा उपदेश नामवंत लेखक,व्यवसाय प्रशिक्षक डॉ. रत्नाकर अहिरे यांनी केला. येथील चांगु काना ठाकूर कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयाच्या सभागृहात महाराष्ट्र लोककल्याणकारी सेवा संस्था आणि चांगू काना ठाकूर कला, वाणिज्य आणि विज्ञान कॉलेज, नवीन पनवेल ( स्वायत्त) यांच्या संयुक्त विद्यमाने नुकतेच आयोजित केलेल्या’ “जर्नी From सिग्नेचर टू ऑटोग्राफ'”या कार्यक्रमांतर्गत प्रेरणादायी व्याख्यानाच्या वेळी ते बोलत होते.

वीरस्वामी शैक्षणिक व सामाजिक विकास संस्था आणि लिटल किड्स आयडीयल स्कूल, नवीन पनवेल हे कार्यक्रमाचे सह आयोजक होते .तर कार्यक्रमाची संकल्पना एन.डी.खान यांची होती.डॉ. रत्नाकर अहिरे पुढे म्हणाले,”पुस्तक, चित्रपट, चारचौघात आपला झालेला अपमान, प्रेरणादायी भाषण यामुळे आपले आयुष्य बदलू शकते. त्यातील सकारात्मक बदलामुळे, आपल्या आयुष्याला निराळी दिशा मिळते. अपेक्षित उंची गाठण्यासाठी, पाया देखील तेवढाच मजबूत पाहिजे. जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर, केवळ डोळेच नव्हे तर पाची इंद्रिये खुली ठेवली पाहिजेत. माणसाने रुचेल व पचेल तेवढेच खावे. मानपान, अहंकार तसेच क्षुल्लक गोष्टींचा बाऊ करू नका. आत्मविश्वास वाढवायचा असेल तर, जी गोष्ट आयुष्यात पूर्वी कधीच केली नसेल, ती केली पाहिजे. जीवनात नेहमी नावीण्य पाहिजे. घर ते कार्यालय एकाच रस्त्याने जाण्यापेक्षा, अधून मधून वेगळ्या रस्त्याने जा. जीवनात काहीतरी वेगळे करा. आतली मनस्थिती आपण चांगली ठेवली तर, बाहेरची कितीही प्रतिकूल परिस्थिती असली, तरी ती अनुकूल होऊ शकते. ‘माता आणि माती’ याकडे लक्ष ठेवा. इथे फक्त वेलांटीचा फरक आहे. कोणतीही कलाकृती प्रथम कलाकाराच्या कल्पनेत, व नंतर प्रत्यक्षात साकार होते. आपल्या निरर्थक आयुष्याला आपल्या कर्तृत्वाने अर्थ प्राप्त होतो. जी माणसं मनापासून ऐकतात, त्यांचे प्रश्न लवकर सुटतात.
आपले म्हणणे अधिक स्पष्ट करण्यासाठी, त्यांनी गरुडासारख्या पक्ष्यांच्या, हत्ती- सिंहासारख्या प्राण्यांच्या गोष्टींचा, विविध आठवणी, किस्से यांचा सढळपणे उपयोग केला. आपल्या वापराल्या अनेक वस्तूंचा उपयोग करून त्यांनी आपले म्हणणे पटवून दिले. प्रसंगी त्यांनी मुकाअभिनयाचा प्रभावी वापर केला. सुमारे दोन- अडीच तास प्रेक्षक मंत्रमुग्ध होऊन, त्यांचे भाषण ऐकत होते. कॉलेजचे सभागृह प्रेक्षकांनी तुडुंब भरले होते.टाळ्यांच्या कडकडाटामधून प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळत होता. कार्यक्रमापूर्वी सौ. सुरेखा भुजबळ यांच्या ‘सूर संध्या संगीत अकॅडमी’ मधील बालचमूंनी विविध समर्पक गीतांचे सुरेल सादरीकरण केले.कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलनाने झाली. संस्थेचे संस्थापक व कार्यक्रमाचे संयोजक एन.डी.खान यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. रुपा भामरे यांनी नेहमीच्या सफाईने केले. संघटक वीरस्वामी शैक्षणिक आणि सामाजिक विकास संस्थेचे संजय हिरेमठ होते. तर समन्वयक लिटल आयडियल किड्स स्कूलच्या प्राचार्या सौ.पूनम गुप्ता व महाराष्ट्र लोक कल्याणकारी सेवा संस्थेच्या कार्यकारी सभासद सौ.सलमा खान होत्या.
कार्यक्रम स्थळी सुधाकर पाटील निवृत्त सहकारी अधिकारी, एकनाथ खुल्लम निवृत्त पोलीस अधिकारी, कॅप्टन मनोज भामरे, पत्रकार मिलिंद पाटील, मंगला बिराजदार, सेजल जाधव, अनिल बिराजदार, पूजा मंडोरा, भाग्यश्री भुजबळ, सलीम मुनवर, केशव कांबळे ब्रेन डेव्हलपमेंट अकॅडमी चे विभांडीक सर व इतर अनेक प्रतिष्ठित उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी, राजकुमार ताकमोगे. सौ.मीना ताकमोगे, सौ.शीतल भामरा, सौ. मृणाल पवार. सौ.सुजाता चोरगे, सौ. क्षमा तिवारी यांनी विशेष परिश्रम घेतले. आभार प्रदर्शनानंतर, या स्फूर्तीदायक कार्यक्रमाची सांगता झाली.


