आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिस विभाग सजग झाला आहे. सध्या निवडणुकीचा ज्वर शहरात वाढू लागला असतानाच शहर पोलिसांनी बुरड मोहल्ल्यातून सुरू असलेली विदेशी दारूविक्री उधळून लावली. पोलिसांनी छापा मारून विविध कंपनीच्या तब्बल २ लाख ६२ हजार रुपयांचा दारूसाठा पकडून दारूविक्रेत्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. ही कारवाई गुन्हे शोध पथकाकडून करण्यात आली.शाहरुख बेग (रा. इतवारा बुरड मोहल्ला) असे दारूविक्रेत्याचे नाव आहे. इतवारा परिसरातील रहिवासी शाहरुख बेग हा घरातून विदेशी दारूची विक्री करत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती.


त्यानुसार पोलिसांनी त्याच्या निवासस्थानी छापा मारला असता मोठ्या प्रमाणात विदेशी दारूचा जकीराच पोलिसांच्या हाती लागला.खोलीत जात पाहणी केली असता विविध कंपनीच्या तब्बल ५५ प्रकारच्या विदेशी दारूच्या बाटल्या, दोन फ्रीज, एक मोबाइल असा एकूण २ लाख ६२ हजार रुपयांचा दारूसाठा जप्त केला. ही कारवाई परिविक्षाधीन पोलिस उपअधीक्षक प्रतीक्षा खेतमाळीस यांच्या मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक पराग पोटे यांच्या उपस्थितीत पोलिस उपनिरीक्षक शैलेश जगताप, शैलेश चाफलेकर, किशोर पाटील, प्रशांत वंजारी, विजय पंचटिके, पवन लव्हाळे, नरेंद्र कांबळे, नंदू धुर्वे, शिवा डोईफोडे, श्रावण पवार, समीर खोब्रागडे, वैभव जाधव यांनी केली आहे. विशेष म्हणजे शहर पोलिस ठाण्यातील गुन्हे शोध पथकांकडून वॉच ठेवला जातो आहे.

