पुणे : नो पार्किंगमध्ये लावलेल्या गाडीचा जॅमर काढण्यासाठी एक हजारांची लाच मागणार्या ट्रॅफिक वॉर्डनसह ती लाच स्वीकारणार्यास संमती दर्शविणार्या सहायक फौजदारावर समर्थ पोलीसांत भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दोघेही समर्थ वाहतूक विभागात कार्यरत आहेत.
सहायक पोलीस फौजदार किरण दत्तात्रय रोटे
(५१),
ट्रॅफिक वॉर्डन अनिस कासम आगा
(४८, रा. कोंढवा) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
याबाबत एका ३७ वर्षीय व्यक्तीने फिर्याद दिली आहे.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ए.सी.बी.) ही कारवाई केली.
समर्थ वाहतूक विभागांतर्गत येणार्या एका रस्त्यावरील नो पार्किंगमध्ये तक्रारदार यांनी त्यांची स्विफ्ट कार पार्क केली होती.
त्यामुळे वाहतूक विभागाने त्यांच्या कारला जॅमर लावले.
हे जॅमर काढण्यासाठी समर्थ वाहतूक विभागातील ट्रॅफिक वॉर्डन (खासगी व्यक्ती) अनिस आगा यांनी तक्रारदार यांच्याकडे १ हजार रुपयांची लाच मागितली.
याबाबत तक्रारदाराने ए.सी.बी.कडे तक्रार दिली होती.
ए.सी.बी.ने याची पडताळणी केली. त्यामध्ये वॉर्डन अनिस याने एक हजारांची लाच मागून तडजोडीअंती सातशे रुपये स्वीकारण्याचे मान्य केले.
अनिस हा कार्यालयात उपस्थित नसताना तक्रारदार समर्थ वाहतूक विभागाच्या कार्यालयात गेले.
त्या वेळी सहायक फौजदार रोटे यांनी अनिसने मागितलेले पैसे माझ्याकडे दे, असे म्हणून लाच घेण्यास संमती दर्शवित अपप्रेरणा दिल्याचे तपासात निष्पन्न झाले.
त्यानुसार ए.सी.बी.ने वॉर्डन अनिस व सहायक फौजदार रोटे यांच्यावर भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे.
ए.सी.बी.चे पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.

