संविधानाने आपल्याला मतदान करण्याचा, नेता निवडण्याचा, नेतृत्व करण्याचा अधिकार दिला. एखाद्या उद्योगपतीचे, नेत्यांचे आणि झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या नागरिकाच्या मताचे मूल्य एकच आहे. कोणत्याही भारतीय नागरिकाला स्थानिक स्वराज्य संस्था, विधिमंडळ, लोकसभा यामध्ये नेतृत्व करता येते.
उपेक्षित वर्गाला राजकीय, शैक्षणिक आणि प्रशासकीय प्रतिनिधित्व मिळावे, याची तरतूद संविधानाने केलेली आहे, यालाच आपण आरक्षण म्हणतो. भारतीय संविधानातील कलम 340, 341, आणि 342 या कलमानुसार अनुसूचित जाती, अनुसूचित जनजाती आणि इतर मागासवर्गीयांना भारतीय संविधानाने आरक्षण दिलेले आहे.
अनेक जाती, धर्म, पंथ, प्रांत, भाषा, भौगोलिक विविधता असणाऱ्या देशाला एकत्र बांधून ठेवण्याचे कार्य भारतीय संविधानाने केलेले आहे.
आपण ज्या पर्यावरणामध्ये राहतो, त्या पर्यावरणाचे रक्षण झाले पाहिजे, कारण पर्यावरणाचे रक्षण झाले तरच मानवाचे अस्तित्व टिकणार आहे. पर्यावरणाच्या रक्षणाच्या जबाबदारीची तरतूद देखील संविधानातील कलम 48 कलम 51 आणि कलम 21 नुसार करण्यात आलेली आहे.
भारतीय संविधान हे जगातील सर्वात मोठे लिखित संविधान आहे. हे जितके कर्तव्यकठोर आहे तितकेच लवचिक आहे. मूळ चौकटीत बदल न करता घटनादुरुस्ती करण्याची तरतूद संविधानात आहे. लोकोपयोगी अनेकवेळा घटनादुरुस्ती झालेल्या आहेत.
संविधानाचा आदर करणे, संविधानाचे संवर्धन करणे आणि संविधानाचे रक्षण करणे हे आपल्या प्रत्येक भारतीय नागरिकाचे कर्तव्य आहे. अशा लोककल्याणकारी संविधानाची अंमलजावणी २६ जानेवारी १९५० पासून झाली म्हणजे खऱ्या अर्थाने देशात प्रजेचे राज्य आले म्हणून हा दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करतात .
प्रजासत्ताक दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा*
जय भारत..! जय संविधान …!
🇪🇺🇮🇳🇪🇺🇮🇳🇪🇺🇮🇳

