
शिरुर प्रतिनिधी :- सचिन दगडे
शिरूर : सरदवाडी (ता. शिरूर) येथील पुणे-नगर महामार्गावर दरोड्याच्या तयारीमध्ये थांबलेल्या तिघांना कंटेनर वाहन व दरोड्यासाठी वापरल्या जाणाऱ्या साहित्यांसह जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग व शिरुर पोलिसांच्या पथकाला यश आले आहे.पकडलेल्या तिघांकडून १५ लाख १७ हजाराचा ऐवज जप्त केला असून, पोलिसांची चाहूल लागताच त्यांचे दोन साथीदार पळून गेले आहेत.

पोलिसांनी कुतुबुद्दीन अख्तर हुसेन (वय ३१ वर्षे रा. सोमका ता. पहरी जि. भरतपूर राजस्थान), यासीन हारुन खान (वय ३२ वर्षे रा. मुदैता ता. पुन्हाना जि. नुहू राजस्थान), व राहुल रशिद खान (वय ३२ वर्षे रा. फलैंडी ता. पुन्हाना जि. नुहू राजस्थान) यांसह पळून गेलेले नौशाद उर्फ नेपाळी व लेहकी (पूर्ण नाव पत्ता माहित नाही ) यांच्या विरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत. याबाबत स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलिस हवालदार संजू ज्ञानदेव जाधव (रा. शिरुर) यांनी शिरुर पोलिस स्टेशन येथे फिर्याद दिली आहे.पुणे-नगर महामार्गावर स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलिस हवालदार संजू जाधव, राजू मोमीन, जनार्दन शेळके व तुषार पंधारे हे सरदवाडी येथे रात्रगस्त घालत असताना येथील हरियाना राजस्थान मेवात ढाब्याजवळ काही नागरिक आर जे ५२ जि ए ७९१६ या कंटेनर मध्ये दरोड्यासाठी वापरल्या जाणाऱ्या साहित्य घेऊन दरोड्याच्या तयारीमध्ये थांबले असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यांनतर त्यांनी शिरुर पोलिसांना माहिती देत शिरुर पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक हनुमंत गिरी, पोलिस हवालदार नाथा जगताप, पोलिस शिपाई निखील रावडे, नीरज पिसाळ, नितेश थोरात, विजय शिंदे यांना बोलावून घेत कंटेनर जवळ गेले असता पोलिसांची चाहूल लागताच दोघेजण पळून गेले.
दरम्यान, पोलिसांनी कंटेनरमध्ये पाहणी केली त्यामध्ये दरोड्याच्या तयारीत असलेले तिघेजण मिळून आले, त्यांची झडती घेतली असता त्यांच्याजवळ गॅस सिलेंडर, कटावणी, लोखंडी गज, दोरी यांसह आदी साहित्य मिळून आले. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेत त्यांच्या जवळील कंटेनर तसेच दरोड्यासाठी वापरले जाणारे साहित्य असा तब्बल पंधरा लाख सतरा हजार रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. त्यांच्या विरुद्ध गुन्हे दाखल केले असून, पुढील तपास पोलिस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक हनुमंत गिरी हे करत आहेत.

