विदर्भ विभाग:- इम्रान खान
वर्धा : पत्नीच्या पेशीसाठी पोलिस गार्ड का लावला नाही, याचा राग मनात धरून पाच जणांनी कारागृहाच्या मुख्य प्रवेशद्वारावर दगडफेक करून लाथा मारल्या. तसेच कर्मचाऱ्यांनी हटकले असता त्यांच्यावरही दगड भिरकावून शिवीगाळ करत चाकूने मारण्याचा प्रयत्न करत शासकीय कर्तव्य बजावण्यात बाधा निर्माण केली. ही घटना जिल्हा कारागृहात दुपारी १२ वाजताच्या सुमारास घडली. याप्रकरणी शहर पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली.बादल शेंडे, अंकुश तिरपुडे, यश श्रीवास्तव, प्रशिक चहादे, शंतनु रामटेके (सर्व रा. रामनगर) असे गुन्हा दाखल केलेल्या सराईत गुन्हेगारांचीनावे आहेत. बादल सकाळच्या सुमारास कारागृहाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ आला आणि माझी पत्नी आचल हिची कोर्ट पेशी असून कोर्टात नेण्यासाठी पोलिस गार्ड लावले का, अशी विचारणा केली.महिला कर्मचाऱ्याने ही बाब गोपनीय असल्याने तुला सांगता येणार नाही, असे म्हटले असता बादल तेथून निघून जात कारागृहाच्या परिसरात उभ्या असलेल्या त्याच्या मित्रांजवळ गेला. दरम्यान त्याच्या मित्रांनी कारागृहाच्या गेटवर जात तेथील स्टाफला शिवीगाळ करून मुख्य दाराला जोरजोरात लाथा मारत कारागृह अधीक्षक व इतर कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करू लागला. कारागृहाचे लहान द्वार उघडून पाहणी केली असताआरोपींना हटकले असता सर्व जण पोलिस कर्मचाऱ्यांना मारण्यासाठी अंगावर धावले. यातील अंकुश तिरपुडे याने चाकू काढत अंगावर मारण्याचा प्रयत्न केला, तसेच आम्हाला पकडले तर तुम्हाला चाकूने मारून टाकेन, अशी धमकी दिली. इतक्यावरच न थांबता त्याच्या सोबत असलेल्या त्याच्या मित्रांनी उपस्थित पोलिस कर्मचाऱ्यांवर दगड भिरकावण्यास सुरुवात केली. काही वेळाने सर्वजण तेथून पळून गेले. याप्रकरणी चंद्रकुमार चामलाटे यांच्या तक्रारीवरून शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. या घटनेवरुन शहरातील या गुन्हेगार प्रवृत्तीच्या युवकांची किती हिंमत वाढली हे दिसून येते. अशा प्रवृत्तींना वेळीच ठेवून काढण्याची गरज व्यक्त होत आहे.


