वर्ध्यात सार्वजनिक बांधकाम विभागाचा घोटाळा!
उपविभागीय अभियंता रोहित चंदेल यांचा “वेस्ट मटेरियल विक्री धंदा” उघड
वर्धा : युसूफ पठान
सार्वजनिक बांधकाम विभाग वर्धा-१ चे उपविभागीय अभियंता रोहित चंदेल यांच्यावर गंभीर आरोप झाले आहेत. गडचिरोली येथून नुकतेच वर्धा-१ मध्ये रुजू झालेले चंदेल यांनी पदभार स्विकारताच थेट शासनाचे वेस्ट मटेरियल विकण्याचा काळाबाजार सुरू केल्याचे धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
पिपरी (मेघे) येथील कारला चौक ते कारला बायपास रस्त्याचे काम पेटी कंत्राटदाराकडून सुरू आहे. रस्त्याचे काम करताना उखडलेली खडी, मुरूम व माती हे “वेस्ट मटेरियल” म्हणून ओळखले जाते. हेच मटेरियल गावातील रस्ते दुरुस्तीसाठी मागितले असता चंदेल यांनी जनतेच्या मागणीकडे थेट दुर्लक्ष केले. इतकेच नव्हे तर पत्रकारांनी घरासमोरील चिखल हटवण्यासाठी हे मटेरियल मागितले असता, त्यालाही सपशेल नकार दिला.
पण दुसरीकडे, ग्रामपंचायतीच्या नावावर दाखवून हेच वेस्ट मटेरियल विक्रीसाठी खुले मैदानात ढिगाऱ्यांमध्ये ठेवण्यात आले. तब्बल २५ ते ५० ट्रक मटेरियल विकले गेल्याचा आरोप आहे. या सर्व प्रकारात चंदेल यांचे संगनमत पिपरी (मेघे) ग्रामपंचायतीच्या ठेकेदाराशी असल्याचे उघड झाले आहे.

याप्रकरणी जिल्ह्याचे कार्यकारी अभियंता सतीश अंभोरे यांनी स्वतः सुचना देऊन “जनतेसाठी मटेरियल वापरण्यास हरकत नाही” असे आदेश दिले होते. मात्र उपविभागीय अभियंता रोहित चंदेल यांनी त्यालाही केराची टोपली दाखवत थेट आदेशाला बगल दिली.
आधीच रस्ता कामाच्या मुदतीपलीकडे काम प्रलंबित असून जनता त्रस्त आहे. त्यातच शासनाचे वेस्ट मटेरियल विकून खिसा भरत बसलेला अभियंता हे जनतेच्या रोषाचे कारण बनले आहे.
पिपरी (मेघे) परिसरातील जनतेने आता या लाचखोर अधिकाऱ्यावर तातडीने कारवाई करण्याची मागणी केली आहे.

