वर्धा:- युसूफ पठान
वर्धा शहरातील एका व्यावसायिकाने समाजात तेढ निर्माण होईल अशी वादग्रस्त पोस्ट व्हॉट्सअॅप ग्रुपवर टाकल्याच्या प्रकरणी वर्धा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे.तक्रारदार नौशाद इलाही बख्श (वय 48), यांचा आर्वी नाका येथील फर्निचर व्यवसाय असून ते “व्यावसायिक व समाजसेवीयोंकी राजकीय चर्चा” नावाच्या व्हॉट्सअॅप ग्रुपचे सदस्य आहेत.
या ग्रुपमध्ये कन्हैय्यालाल चैनानी यांच्यासह एकूण 428 सदस्य असून त्यात विविध धर्मीय लोक सहभागी आहेत.२४ सप्टेंबर रोजी दुपारी २ वाजून १७ मिनिटांनी चैनानी यांनी ग्रुपमध्ये इस्लाम धर्मातील हदीसविषयी चुकीचा अनुवाद आणि अपमानास्पद मजकूर असलेली पोस्ट शेअर केली.
तक्रारदाराच्या म्हणण्यानुसार सदर पोस्ट ही द्वेषयुक्त असून धार्मिक भावना भडकवणारी आहे. त्यामुळे दोन समाजात तेढ निर्माण होण्याची शक्यता आहे.पोलीस ठाण्यात दिलेल्या तोंडी रिपोर्टसोबत तक्रारदाराने वादग्रस्त पोस्टची झेरॉक्स प्रत तसेच खऱ्या हदीसची प्रतही सादर केली आहे.
कन्हैय्यालाल चैनानी यांच्या विरोधात कायदेशीर कारवाईची मागणी करण्यात आली असून, पोलीस या प्रकरणी पुढील तपास करीत आहेत.


