मराठवाडा विभाग प्रमुख :-शुभम उत्तरवार
बालविवाह हा कायद्याने दंडनीय गुन्हा असताना देखील ग्रामीण भागात असे प्रकार घडत असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. देगलूर तालुक्यातील सुजायतपूर येथे झालेल्या बालविवाह प्रकरणी प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालय, देगलूर यांनी गंभीर दखल घेत पोलीसांना गुन्हा दाखल करून तपास करण्याचे आदेश दिले आहेत.
सदर विवाहात तालुक्यातील काही राजकीय नेते व आजी-माजी अधिकाऱ्यांची उपस्थिती होती. मुलीच्या आईने देगलूर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविण्याचा प्रयत्न केला मात्र तक्रार न घेता तिला परत पाठविण्यात आल्याने त्यांनी थेट न्यायालयाचा दरवाजा ठोठावला.
प्रकरणाची कागदपत्रे तपासून व वकिलांचा युक्तिवाद ऐकून, न्यायालयाने बालविवाह प्रतिबंधक कायदा 2006 अंतर्गत कलम 9, 10 व 11 नुसार गुन्हा दाखल करून तपास करण्याचे आदेश देगलूर पोलीस निरीक्षकांना दिले आहेत.
या प्रकरणी अर्जदाराच्या वतीने अॅड. फयाज दादेखान पठाण यांनी युक्तिवाद केला. तर अॅड. मकीन मसूद, अॅड. शिल्पा रिंगणमोडे, अॅड. बालाजी गजभारे, अॅड. पी. आर. होळगे यांच्यासह क्रिस्टल लीगल असोसिएट्समधील वैभव आठवडे, निखिल जोंधळे, गजानन मुडे व विनायक कदम यांनी सहकार्य केले.

