वर्धा विभाग प्रतिनिधी: – युसुफ पठाण.
पालकमंत्री पंकज भोयर, काँग्रेस नेते शेखर शेंडे व सुधीर पांगुळ यांची प्रमुख उपस्थिती…
ईद मिलादुन्नबी या पवित्र दिनानिमित्त वर्धा शहर साक्षीदार ठरले एका अद्वितीय आणि भव्य मिरवणुकीचे. हजारो नागरिकांनी आनंदाने आणि उत्साहाने सहभाग नोंदवत, संपूर्ण शहरात सौहार्द, प्रेम आणि धार्मिक सलोख्याचे अनोखे दृश्य साकारले.
मुख्य बाजारपेठ येथून सुरू झालेली मिरवणूक नबीच्या गजरात, रंगीबेरंगी रोषणाईच्या प्रकाशात आणि फुलांच्या वर्षावात शहरातील मुख्य मार्गांनी मार्गक्रमण करत जामा मस्जिद येथे शांततेत समाप्त झाली. या उत्सवाने वर्धा शहराचा प्रत्येक कोपरा झगमगून गेला होता.
या मिरवणुकीला वर्ध्याचे पालकमंत्री पंकज भोयर यांनी उपस्थित राहून मुस्लिम बांधवांना मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. त्यांच्या उपस्थितीने उपस्थितांमध्ये आनंदाचे व उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.
या भव्य मिरवणुकीस काँग्रेस नेते शेखर शेंडे तसेच सुधीर पांगुळ यांचीही प्रमुख उपस्थिती लाभली. शहरातील विविध भागांमध्ये नागरिकांनी आणि संस्थांनी स्वागत कमानी, पुष्पवृष्टी, पाणपोया, लंगर वितरण आणि सामाजिक उपक्रम राबवत आपली एकजूट आणि सेवा भावना दाखवली.
हिंदू-मुस्लिम नागरिकांनी परस्पर ईदच्या शुभेच्छा देवून सणाचा खरा अर्थ साजरा केला. यामुळे धर्मीय ऐक्य, सामाजिक सलोखा आणि सांस्कृतिक एकात्मता यांचा संदेश सर्वदूर पोहोचला.
या भव्य मिरवणुकीने वर्धा शहरात एकात्मतेचा, प्रेमाचा व शांततेचा दीप पुन्हा एकदा प्रज्वलित केला आहे. वर्धा शहरातील नागरिकांनी दिलेला हा आदर्श सामाजिक सलोख्याचा संदेश संपूर्ण समाजासाठी प्रेरणादायक ठरतो आहे.




