चामोर्शी–हरणघाट मार्गाची दुरावस्था : भेंडाळ्यात “आजाद” चा ८ सप्टेंबरला चक्काजाम
गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी :- आशिष लाकडे.
गडचिरोली जिल्ह्यातील अत्यंत महत्त्वाचा समजला जाणारा चामोर्शी – हरणघाट – मूल मार्ग सध्या पूर्णपणे जीर्णावस्थेत असून मोठमोठे खड्डे पडल्याने नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. दररोज या मार्गावरून ये-जा करणाऱ्या शेकडो वाहनधारकांना व प्रवाशांना या खड्डेमय रस्त्यामुळे अपघाताचा धोका कायम निर्माण झाला आहे. विशेषतः पावसाळ्यात रस्त्यावर पाणी साचल्याने खड्ड्यांचा अंदाज येत नाही व त्यामुळे अनेक अपघात घडले असून, नागरिकांचे प्राण धोक्यात आले आहेत.
याकडे प्रशासन व लोकप्रतिनिधी यांचे पूर्णपणे दुर्लक्ष झाल्याने जनतेत तीव्र संतापाची लाट पसरली आहे. नागरिकांच्या सोयीसाठी असलेले रस्तेच आज जीवघेणे ठरत आहेत, ही परिस्थिती अत्यंत धोकादायक असून दुर्लक्ष सहन केले जाणार नाही. याची गंभीर दखल घेत आजाद समाज पार्टी ने घेतली असून जिल्हाध्यक्ष राज बन्सोड यांच्या नेतृत्वात भेंडाळ्यात चक्काजाम आंदोलन घेण्याचा इशारा दिला. यासंदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागाला आसपा जिल्हा सचिव प्रकाश बन्सोड, सोनू वाळके, देवानंद बोरकर, भाऊराव खोब्रागडे, महेश डांगे, राहुल वैरागडे यांच्या उपस्थितीत निवेदन देण्यात आले.

ग्रामस्थांच्या संगणमताने ८ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी 11 वाजता या मार्गावर “चक्काजाम आंदोलन” छेडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
प्रशासनाने तातडीने रस्ता दुरुस्त करून नागरिकांना दिलासा द्यावा, प्रशासनाने त्वरित लक्ष देऊन रस्ता दुरुस्त केल्यास होणारे अपघात, नागरिकांची हालअपेष्टा आणि संभाव्य जीवितहानी टाळता येईल. अन्यथा *आंदोलन तीव्र करण्याचा इशारा आजाद समाज पार्टीने दिला आहे.


