सरसकट एकरी 25 हजार रुपये तर जास्त नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान एक लाख भरपाई द्या- शंकर अण्णा धोंडगे
कंधार (ता.प्र.);- ज्ञानेश्वर कागणे
कंधार- लोहा तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे, कष्टकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे.या अतिवृष्टीग्रस्तांना तातडीने नुकसान भरपाई देण्याऐवजी सत्ताधारी व महायुतीत सहभागी असलेल्या लोकप्रतिनिधीकडून निवडणुकीपूर्वी केलेल्या घोषणा व आश्वासनाप्रमाणे आताही जर ते केवळ अश्वासनाची खैरातच करीत असेल तर अशा गेंड्याच्या कातडीच्या सरकारला वठणीवर आणण्यासाठी तसेच सरकारच्या शेतकरी विरोधी व नकारात्मक धोरणाच्या निषेधार्थ महाराष्ट्र राज्य समितीच्या वतीने बुधवार दि.३ सप्टेंबर रोजी कंधारच्या उपविभागीय कार्यालयावर धडक मोर्चा काढून अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई देण्यात यावी.यासह अन्य मागण्याचे निवेदन उपविभागीय अधिकारी कंधार यांना देण्यात आले.
एमआरएस पक्षाचे संस्थापक अध्यक्ष तथा माजी आमदार शंकर अण्णा धोंडगे यांच्या नेतृत्वात भुईकोट किल्ल्या पासून निष्क्रिय सरकारचा धिक्कार असो,पंचनाम्याचे लफडे थांबून थेट मदत द्या,उपकार नको अधिकार हवा अशा गगनभेदी घोषणा देत या धडक मोर्चाला सुरुवात झाली.हा मोर्चा गांधी चौक,छत्रपती शिवाजी महाराज चौक,डॉ.बाबासाहेब आंबेडकर परिसर मार्ग कंधार उपविभागीय कार्यालयावर धडकला.या ठिकाणी मोर्चाचे रूपांतर भर सभेत झाले.यावेळी धोंडगे बोलताना म्हणाले की,जोपर्यंत अतिवृष्टीग्रस्तांना नुकसान भरपाई मिळणार नाही.तोपर्यंत आम्ही स्वस्त बसणार नाही.
असं वागणं बरं नव्हं नियत एक ना एक दिवस तुमचा सूड उगवेल असा टोला ही आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांचे नाव घेता त्यांनी लगावला.यावेळी एमआरएस च्या वतीने विविध मागण्याचे निवेदन उपविभागीय अधिकारी यांना देण्यात आले.सदरील दिलेल्या निवेदनात अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना प्रति एकर २५ हजार रुपये नुकसान भरपाई देण्यात यावी.नदी ओढ्या काठच्या खरडून गेलेल्या जमिनीला प्रति एकर एक लाख रुपये देण्यात यावे.शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमुक्ती करण्याची हीच योग्य वेळ असल्याने संपूर्ण कर्जमुक्ती करावी.
वाहून गेलेले गुरेढोरे,पडझड झालेली घरे व पाणी घरात घुसल्याने संसार उपयोगी साहित्याची झालेली हानीची नुकसान भरपाई देण्यात यावी.मागच्या काळातील व चालू वर्षातील पिक विमा तातडीने द्यावा आणि ओला दुष्काळ जाहीर करावा.आदी प्रमुख मागण्या करण्यात आल्या आहेत.या मोर्चात एमआरएस पक्षाचे नेते दत्ताजी पवार,सुभाषराव मोरे,अशोकराव सोनवणे,नांदेड जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष दिलीप दादा धोंडगे,जीवनराव वडजे,युवा नेते शिवराज धोंडगे,संतोष कागणे आदिंसह पदाधिकारी,कार्यकर्ते,नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.


