कोविड १९ या जागतिक महामारीच्या काळात सेवा देणाऱ्या एनएचएम कर्मचारी यांची शासनाकडून उपेक्षा
आंदोलनाचा आजचा 14 वा दिवस, तरीही शासनाकडून निराशा पदरात…
गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी :- आशिष लाकडे
गडचिरोली (दि.१ सप्टेंबर)दि. 14/03/2024 रोजी राष्ट्रीय आरोग्य अभियान कर्मचारी यांना नियमित सेवेत समावेशन करणेसाठी शासननिर्णय निर्गमित झाला आहे. सव्वा वर्षे कालावधी होवूनही अंमलबजावणी होत नसलेने तसेच मानधनवाढ, Loyalty Bonus, EPF, Insurance, बदली धोरण मान्य होत नसलेने तसेच मा. आरोग्य मंत्री महोदय, महाराष्ट्र राज्य यांनी दि. 08 व 10 जुलै 2025 रोजी संघटना शिष्टमंडळास समायोजन प्रक्रिया व विविध मागण्यांबाबत दिलेल्या आश्वासनाची पुर्तता न झाल्याने मंगळवार दि. 19/08/2025 पासून संपूर्ण महाराष्ट्रात बेमुदत कामबंद आंदोलन सुरू केलेले आहे.
गडचिरोली जिल्ह्यातील १२०० अधिकारी व कर्मचारी हे भर पावसात जिल्हा रुग्णालय परिसरात आपल्या न्याय मागण्यांसाठी गेल्या १४ दिवसापासून आंदोलन करीत आहेत. परंतु अद्यापही शासनाने त्यांची कोणतीही दखल घेतलेली नसल्याचे दिसून येते. कोविड १९ या जागतिक महामारीच्या काळात याच कंत्राटी कर्मचारी यांनी स्वतःच्या जीवाची कुठलीही पर्वा न करता अहोरात्र सेवा दिली होती, हे विशेष.शासन स्तरावरून संबंधितांच्या न्याय मागण्यांना घेऊन कुठलीही हालचाल होत नसल्याचे पाहून सदर कर्मचारी आक्रमक आंदोलन करण्याच्या तयारीत असून त्याकरिता आज दिनांक ०१ सप्टेंबर रोजी सहविचार सभा आंदोलन स्थळी घेण्यात आली. त्यामध्ये दिनांक २ रोजी शासनाच्या १०४ या तक्रार पोर्टल वर सर्वांनी मागण्यांबाबत व शासन निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी तक्रार दाखल करणे, दिनांक ३ रोजी थाळी नाद आंदोलन करणे, दिनांक ४ रोजी काळे कपडे परिधान करून शासनाच्या दिरंगाईचा निषेध नोंदविणे, दिनांक ५ रोजी सर्व आजी – माजी खासदार व आमदार यांचे दारी जाऊन मागण्यांचे साकडे घालणं इत्यादी उपक्रम राबविण्यात येणार आहेत.
त्याऊपरही शासनाने दखल न घेतल्यास दिनांक ८ रोजी विभागीय कार्यालयावर धडक मोर्चा, ९ रोजी जेलभरो आंदोलन व दिनांक १० पासून साखळी उपोषण करण्याचा निर्धार या कर्मचारी यांनी केलेला आहे. यावेळी राष्ट्रीय आरोग्य अभियानातील शेकडो अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.


