खर्डी (शहापूर) येथील युवक…
खर्डी प्रतिनिधी :- सगीर शेख
पाणी हेच जीवन आहे ,कारण जेथे पाणी नाही तेथे जीवन नाही. पृथ्वीवर जीवन आहे त्याचे मुख्य आणि एकमेव कारण म्हणजे पाणी .इतर ग्रहांवर पाणी नसल्यामुळे तेथे सजीवसृष्टी किंवा जीवन नाही.आपण सर्वच पाण्यावर अवलंबून आहोत. शेती असो, घर असो,सोसायटी असो किंवा एखादी कंपनी असो ,पाण्याशिवाय कोणतेही प्रोजेक्ट हे शक्य नाही . पृथ्वीवरील एकूण पाण्याच्या 2.5 %पाणी हे गोडे पाणी असून 97.5%खारे पाणी आहे. या 2.5% गोड्या पाण्याच्या 29.7% पाणी हे भूगर्भात तर 0.3% पाणी हे भूपृष्ठभागावर पिण्यासाठी उपलब्ध आहे तर 70% गोडे पाणी हे हिमनद्या आणि बर्फाच्या शिखरांमध्ये गोठलेले आहे .
भारतात एकूण उपलब्ध गोड्या पाण्यापैकी सुमारे 80% ते 90% पाणी शेतीसाठी वापरले जाते.अनेक शेतकरी शेतीसाठी विहिरी करतात , बोरवेल करतात परंतु आजही भूगर्भातील पाणी शोधण्यासाठी अंधश्रध्येने नारळाचा उपयोग करतात .नारळाची शेंडी तळहातावर उभी राहील तेथे पाणी मिळेल. परंतु या अंधश्रध्येला कोणतीही विज्ञानिक मान्यता नाही . त्यामुळे अनेक वेळेस लाखो रुपये खर्च करून केलेल्या विहिरी आणि बोरवेल कोरड्या निघतात आणि शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान होते.त्यामुळे आधीच कर्जाखाली दाबला गेलेल्या बळीराजाच्या नशिबी पुन्हा नैराश्य आणि दुःखच येते .
भूगर्भातील पाणी शोधण्यासाठी “इलेक्ट्रिकल रेसिस्टीव्हिटी” तंत्रज्ञान किंवा ” व्हर्टिकल इलेक्ट्रिकल साऊंडिंग”सारखे शास्त्रीय मान्यताप्राप्त तंत्रज्ञान जगभरात प्रसिद्ध आहे . परंतु या तंत्रज्ञानावर आधारित मशीन या 7-15 लाख रुपये किमतीपर्यंत असतात . तसेच या मशीन दुसऱ्या देशात बनविल्या जातात .
परंतु खर्डी ,तालुका- शहापूर, जिल्हा- ठाणे येथील एक तरुण वैज्ञानिक हेमंत यशवंत परदेशी (वय 40 वर्षे) याने भारतीय बनावटीची आणि अतिशय कमी खर्चात अशीच एक भूजलाचा शोध घेणारी आणि वैज्ञानिक मान्यताप्राप्त मशीन बनवली आहे . ज्यामुळे शेतकऱ्यांचा विहिरीसाठी किंवा बोरवेलसाठी पाणी शोधण्याचा प्रश्न आता सुटला आहे .
या मशिनद्वारे भूजल किती फुटावर असू शकते ? भूगर्भाची रचना कशी आहे? अधिक भूजल शेताच्या किंवा आपल्या प्लॉटच्या कोणत्या भागात आहे ?बोरवेल कोठे करावी? विहीर कोठे करावी ? हे प्रश्न सुटणार आहे.तसेच अभियांत्रिकी कामात, खनिज संशोधनात आणि पर्यावरण संशोधनात या मशीनचा खूप उपयोग होऊ शकतो .ही मशीन भूगर्भात 2000 फूट खोलीपर्यंतचा डेटा घेऊ शकते . हेमंत परदेशी या मशीनचे पेटंट घेणार असून लवकरच या मशीनचे उत्पादन चालू करणार आहेत . तसेच तरुणांना आणि इच्छुकांना या मशीनचे व्यावसायिक प्रशिक्षणही देणार आहेत .
जेणेकरून हे तंत्रज्ञान संपूर्ण भारतभर पसरले पाहिजे आणि सर्व शेतकरी , उद्योजक आणि इतर नागरिकांना याचा फायदा झाला पाहिजे .हेमंत परदेशी यांनी मास्टर ऑफ सायन्स ही डिग्री घेतलेली असून त्यांना 13 वर्षांचा संशोधनाचा अनुभव आहे .याआधीही हेमंत परदेशी यांचे शेतकऱ्यांसाठी काम करणाऱ्या भारतातील एका मोठ्या कंपनीसाठी 3 वेगवेगळे संशोधनाचे 3 पेटंट्स आहेत.

