अकोला विभाग प्रतिनीधी: – गणेश वाडेकर
आमदार अमोल मिटकरींचा मनपा ला सज्जड दम
अकोला –
शहराच्या मध्यवर्ती भागातील सुभाष चौकात उभारण्यात आलेल्या नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या पुतळ्याची विटंबना होत असल्याचे चित्र समोर आले आहे. पुतळ्याभोवती साचलेली घाण, नागरिकांची लघुशंका आणि रात्रीच्या वेळी पुतळ्यालगत गाड्या उभ्या करण्याच्या प्रकारामुळे राष्ट्रपुरुषाच्या स्मारकाचा अपमान होत असल्याची भावना व्यक्त होत आहे.
ही परिस्थिती प्रत्यक्ष पाहून आमदार अमोल मिटकरी संतापले. त्यांनी मनपाच्या अधिकाऱ्यांना घटनास्थळी बोलावून जाब विचारला. पुतळ्याला तातडीने कंपाऊंड घालणे, संपूर्ण परिसराची साफसफाई करणे आणि अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी कायमस्वरूपी कारवाई करणे याचे आदेश त्यांनी दिले.
“इतक्या वर्षांत हे काम का झाले नाही?” असा थेट सवाल आमदार मिटकरींनी अधिकाऱ्यांना करत कानउघडणी केली. या पुढाकारामुळे परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले असून, नेताजींच्या स्मारकाच्या जतनासाठी घेतलेले आमदारांचे पाऊल कौतुकास्पद ठरत आहे.

