युसुफ् पठाण:- विभाग प्रतिनिधी
मुंबई उच्च न्यायालयाचे कोल्हापूर खंडपीठाने जून 2024 पूर्वी देण्यात आलेल्या नियुक्त्याना पवित्र पोर्टलचे कारण देऊन मान्यता नाकारता येणार नाही असा शिक्षण क्षेत्राशी संबंधित ऐतिहासिक निकाल दिलेला आहे. मुंबई उच्च न्यायालयाचे दिनांक १८-८-२०२५ पासून कोल्हापूर येथे खंडपीठ सुरू झालेले आहे. श्री यशवंत शिक्षण प्रसारक मंडळ कोडोली संचलित यशवंत हायस्कूल व उच्च माध्यमिक विद्यालय कोडोली येथे रीतसर भरती प्रक्रिया करून संस्थेने श्री अवधूत गोरखनाथ कुंभार यांची दिनांक १-१०-२०२१ पासून सहाय्यक शिक्षक म्हणून शिक्षणसेवक पदी नियुक्ती केली होती.
सदर नियुक्तीस शिक्षणाधिकारी (माध्य.), जिल्हा परिषद, कोल्हापूर यांनी पवित्र पोर्टलचे कारण देऊन वैयक्तिक मान्यता नाकारली होती. त्याविरुद्ध संबंधित संस्थेने,शाळेने तसेच शिक्षक सेवक यांनी मुंबई उच्च न्यायालयामध्ये एकत्रितरित्या रिट याचिका दाखल केली होती. सदर याचिका मुबंई उच्च न्यायालयाचे कोल्हापूर येथे खंडपीठ सुरू झाल्यानंतर, कोल्हापूर खंडपीठाकडे सुनावणीसाठी वर्ग करण्यात आली होती.
या याचिकेची दिनांक १९-८-२०२५ रोजी अंतिम सुनावणी होऊन मा. कोल्हापूर खंडपीठाने शिक्षण क्षेत्रातील ऐतिहासिक निकाल देताना जून, २०२४ पूर्वीच्या नियुक्तांना पवित्र पोर्टल भरती प्रक्रियेचे कारण देऊन मान्यता नाकारता येणार नाही असे अनुमान नोंदवून संबंधित शिक्षण सेवकाचे नियुक्तीस वैयक्तिक मान्यता व शालार्थ आयडी देणेबाबत तसेच थकित वेतन अदा करण्याचे आदेश दिले. सदर निकालाचा राज्यभरातील अशा प्रकारच्या सहाय्यक शिक्षकांना फायदा होणार आहे.



