बोरी खुर्द येथील पिराजी जायभाये यांनी टिपलेले छायाचित्र
अप्पर मानारचे १५ दरवाजे उघडले: नदी काठच्या गावांना धोक्याचा ईशारा!
कंधार प्रतिनिधी:-ज्ञानेश्वर कागणे.
कालपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे कंधार तालुक्यातील जनजीवन विस्कळीत झाले असून शेतक-यांच्या हातातोंडाशी आलेले पिक निसर्गाने हिरावून घेतले आहे.
बैलपोळ्यानंतर पावसाचा वेग शक्यतोवर मंदावतो परंतू यावर्षी महाराष्ट्रात भर उन्हाळ्यात मे महिन्यांत मुबलक पाऊस झाला. त्यानंतर पावसाळ्यात मराठवाड्यात कमी जास्त पाऊस पडत राहीला त्यामुळे पीकें जोमात होती. पण मागील पंधरा दिवसांपूर्वी पडलेल्या पावसामुळे सुरुवातीला पेरलेल्या मुग पिकांचे अतोनात नुकसान झाले. मध्यंतरी पावसाने उघडीप दिल्याने उशीरा पेरलेला मूग हाती लागेल अशी शेतकर्यांना अपेक्षा होती परंतू कालपासून सुरु झालेल्या संततधार व मुसळधार पावसाने याही मुगाचे अतोनात नुकसान केले असून यामुळे शेतकरी वर्ग हवालदिल झाला आहे.
तालुक्यातील अनेक गावांत ढगफुटी सदृष्य पाऊस झाला असून अनेक गावाचा संपर्क तुटलेला आहे. ग्रामीण भागातील रस्त्याच्या छोट्या पुलावरून पाणी वाहत असल्यामुळे वाहतूक बंद झाली आहे.
अप्पर मानार लिंबोटी धरण जवळपास ९५ टक्के भरले असून त्यामुळे या धरणाचे पंधरा दरवाजे उघडून मन्याड नदीत पाण्याचा विसर्ग सोडला आहे. ज्यामुळे नदीकाठच्या गावांना धोका निर्माण झाला असून प्रशासनाकडून या गावांतील लोकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
अप्पर मानार धरणाचे पाणी मन्याड नदीत सोडल्याने नदी दुथडी भरून वाहत असल्याने बहादरपूरा येथील पुलावरून दोन फूट पाणी जात असल्याने कंधार – मुखेड व कंधार – उदगीर वाहतूक बंद केली असून ती छोडज शेकापूर मार्गे वळवण्यांत आली आहे.
पावसाने एवढा हाहाकार माजवला तरी महसूल प्रशासनाने याकडे साफ दुर्लक्ष केल्याचे दिसून आले.

कारण दुपारी बारा वाजेपर्यंत बहादरपूरा पूलावर कोणतीही सतर्कता सूचना लावलेली नव्हती किंवा पोलीस अथवा महसूल कर्मचारी हजर नव्हता. या बेजबाबदार वृत्तीमुळे एखादी अप्रिय घटना घडली असती तर त्यास कोर्ण जबाबदार असा सामान्यांतून प्रश्न विचारला जात आहे.
आतातरी महसूल प्रशासनाने सतर्क राहून सामान्य जनतेच्या जीवीताचे रक्षण करण्याचा प्रयत्न करावा तसेच लिंबोटी, डोंगरगाव ,चोंडी, दगडसांगवी, बोरीखुर्द ,उमरज, आनंदवाडी ,जांभळवाडी ,संगमवाडी घोडज शेकापूर कंधार बहादरपुरा या नदीकाठच्या शेतकऱ्यांच्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून शासनाकडून मदत मिळवून द्यावी अशी सर्व स्तरातून मागणी होत आहे.

