अधिकाऱ्यांची बेशिस्त खपवून घेतली जाणार नाही -आ. चिखलीकर
कंधार / प्रतिनिधी:- ज्ञानेश्वर कागणे
कंधार तालुक्यात झालेल्या अतिवृष्टी व पुरपरिस्थितीमुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या अध्यक्षतेखाली दि. २१ ऑगस्ट रोजी गुरुवारी दुपारी २ वाजता तहसील कार्यालयातील सभागृहात बैठक घेण्यात आली. या बैठकीत नुकसानीचा अंदाजपत्रक तात्काळ तयार करून शासनाकडे सादर करण्याचे स्पष्ट निर्देश आमदार चिखलीकर यांनी अधिकाऱ्यांना दिले.
या बैठकीस उपविभागीय अधिकारी तथा तहसीलदार रामेश्वर गोरे, माजी जिल्हा परिषद सभापती प्रवीण पाटील चिखलीकर, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती संजय देशमुख, प्रा. कीशनराव डफडे, बाबुराव केंद्रे उमरगेकर, स्वप्निल पाटील लुंगारे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष मनोहर भोसीकर, लोहा माजी उपनगराध्यक्ष दत्ता वाले, बाबुराव गिरे, सरपंच संघटना अध्यक्ष मारोती पंढरे, पोलीस निरीक्षक चंद्रकांत जाधव, गटविकास अधिकारी महेश पाटील, सार्वजनिक बांधकाम उपविभागीय अभियंता सुमीत पाटील, मुख्याधिकारीसंदीप भोळे, विद्युत वितरण सहाय्यक अभियंता मठपती यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व मान्यवर उपस्थित होते.
बैठकीपूर्वी कोटबाजार येथील दुदैर्वी घटनेत मृत्यू पावलेल्या शेख नासेर शेख अमीन व हसीना बेगम यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्यांच्या वारस मुसा नासेर शेख यांना शासनाकडून प्रत्येकी चार लाख रुपयांचा मदत खात्यात जमा करण्यात आले असून इ डिव्हाईस पत्र आमदार चिखलीकर यांच्या हस्ते सरपंच मोहम्मद अजीम व ग्रामस्थांच्या उपस्थितीत देण्यात आला.
तहसीलदार रामेश्वर गोरे यांनी माहिती देताना सांगितले की, तालुक्यात यावर्षी आतापर्यंत ५२८ मि.मी. पाऊस झाला असून हा सरासरी पावसाच्या ६५ टक्के आहे. मात्र १५ व १६ ऑगस्ट रोजी कंधार, फुलवळ, कुरुळा, उस्माननगर व दिग्रस मंडळात अतिवृष्टी झाली. या अतिवृष्टीमुळे कोटबाजार येथे दोन व्यक्तींचा मृत्यू, आठ जनावरे दगावली, 18 घरांचे अंशतः नुकसान झाले असून २५, हजार ७५४.५ हेक्टर क्षेत्रातील पिकांचेनुकसान झाले आहे. एकूण ५६ हजार लोक बाधित झाल्याचे प्राथमिक अंदाजात स्पष्ट झाले आहे.
गोरे यांनी पुढे सांगितले की, पंचनाम्यांची प्रक्रिया सुरू असून चार दिवसांत पूर्ण केली जाईल. जनावरे व घरपडीबाबत लवकरच शासकीय मदत देण्यात येईल. अतिवृष्टीमुळे मानसपुरी, कंधारेवाडी, गंगणबीड, हाळदा, बोरी खुर्द गावांचा संपर्क तुटला होता. तसेच बारुळ प्रकल्प 100 टक्के भरला असल्याची माहिती देण्यात आली. मानसपुरी, कंधारेवाडी, गंगनबीड ,बोरी खुर्द ,हळदा येथील पुलाचे इस्टिमेट बनवा अशा अधिकाऱ्यांना सूचना दिल्या.
यावेळी आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी अधिर्कायांना कठोर शब्दात इशारा देत सांगितले की, शाळेच्या धोकादायक इमारतींची माहिती तात्काळ द्या, पाण्यात वाहून गेलेल्या जनावरांचे पंचनामे करा. कामचोरपणा करणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी सुधारणा केली नाही, तर बदली करून घ्या. दिरंगाई कदापि सहन केली जाणार नाही. नुकसानीचे अंदाजपत्रक तातडीने शासनाकडे पाठवा व बाधित शेतकरी-नागरिकांना त्वरित मदत मिळवून द्या. असे यावेळी सांगितले.

