रहिवाशांचा जीवघेणा प्रवास सुरू…
प्रतिनिधी:- सुनील वर्मा
लोणार शहरातील मेहकर रोड परिसरातील गीतम लॉज समोरील ड्रेनेज नाल्याच्या कामासाठी रस्ता खोदण्यात आला असून कित्येक दिवसांपासून हे अर्धवट पडले आहे. परिणामी, शेकडो रहिवाशांचा मुख्य मार्ग बंद झाला असून शाळकरी मुले, कामावर जाणारे चाकरमानी आणि स्थानिक नागरिकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे.
गीताम लॉज समोरील कॉलनीत. ड्रेनेज नाल्याचे काम ऐन पावसाळ्यात सुरू करण्यात आले आहे. नागरिकांनी आधीच प्रशासनाला विनंती केली होती की, पावसाळ्यात खोदकाम करू नये. मात्र या विनंतीचा नगरपालिका प्रशासनाने कोणताही विचार केला नाही. या भागातील घरांचे मुख्य रस्त्यावरून संपर्क पूर्णतः तुटलेला आहे. खोदलेला रस्ता चिखलमय, घसरडा व अतिशय अपायकारक आहे.

नागरिकांना रोजच्या जगण्यासाठी, कामावर जाण्यासाठी, शाळेतील विद्यार्थ्यांना शिकवणीसाठी जाताना जोखमीने भरलेला मार्ग पार करावा लागत आहे. या खोदलेल्या रस्त्यावर अपघाताचा धोका प्रचंड वाढला आहे. मोटारसायकली घसरत आहेत, वृद्ध आणि महिला चालताना त्रास होत आहे. अशा वेळी कुणाचा जीव गेला, तर त्याची जबाबदारी कोण घेणार? हा सवाल नागरिक प्रशासनाला विचारत आहेत. विशेष म्हणजे या खोदलेल्या रस्त्याचे काम अतिशय धीम्या गतीने होत असल्यामुळे नागरिकांत संतापाची लाट उसळली आहे.
संबंधित अधिकार्यांकडे वारंवार तक्रार करूनही कोणतीही कृती झालेली नाही. काही ठिकाणी खोदकामानंतर यंत्रणाही दिसून येत नाही. त्यामुळे अपूर्ण कामावर तात्पुरती व्यवस्था करावी. नागरिक, विद्यार्थी, चाकरमान्यांना सुरक्षित मार्ग उपलब्ध करून द्यावा, अन्यथा दोषींवर कारवाई करण्याची मागणी होत आहे.
“आम्ही गीतम लॉज समोरील रहिवाशी आहोत. ड्रेनेज लाईनच्या कामासाठी कॉलनीत जाणारा रस्ता खोदण्यात आला. नगरपालिकाला तोंडी सांगण्यात आले होते की, आमच्या लोकांना जाण्यासाठी हा एकमेव रस्ता असल्यामुळे पावसाळ्यात हा रस्ता खोदण्यासाठी नागरिकांचा विरोध होता. मात्र नगरपालिकेने या तोंडी सूचना कडे दुर्लक्ष करत रस्ता खोदला गेला. मात्र, रस्त्याचे गेल्या काही दिवसापासून काम अर्धवट ठेवून कामगार देखील काम करताना दिसत नाहीत. त्यामुळे आम्हा नागरिक, शाळकरी मुले आणि चाकरमान्यांचा जीवघेणा प्रवास सुरू आहे.” –
श्री तेजनकर, स्थानिक नागरिक

