परभणी जिल्हा प्रतिनीधी: – प्रल्हाद निर्मल
पेठवडगावात बंद घराची कुलपे तोडून चोरी रोख रक्कमेसह वीस लाख रुपयांचा ऐवज लंपास.
पेठ वडगांव येथील कोल्हापूर रोडवर असणाऱ्या सचिन दत्तात्रय कदम यांच्या बंद घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून वीस तोळे सोन्याचे दागिने व रोख रक्कम दोन लाख असा सुमारे अठरा ते वीस लाखांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला.तसेच पोलीस स्टेशन समोरील दत्तनगर येथेही अशाच प्रकारे सोने व रोख रक्कम चोरी करण्यात आली.कोल्हापूर रोडवर गणेश मंदिरासमोर सचिन दत्तात्रय कदम राहत असून ते पुणे येथे नातेवाईकांचे लग्न समारंभ असल्याने शुक्रवारी दुपारी ते घराला कुलूप लावून सहकुटुंब पुण्याला गेले होते.या घरावर चोरट्यांनी पाळत ठेवत घरी नसल्याचे पाहून शनिवारी मध्यरात्री दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला.बाजूस असलेल्या खोलीमध्ये प्रवेश करून तिजोरी कटावणीने उचकटली.आतील साहित्य विस्कटले होते .

लाॅकर तोडून चोरट्यांनी लाॅकर मधील लहान मुलांच्या दोन चेन, लहान चार अंगठी, कोल्हापूरी साज, सोन्याचा हार,गोल हार, मोहन माळ, गंठण, चांदीचे नाणी,ठेव पावती, कानातील फुले, असे सुमारे वीस तोळे सोन्याचे दागिने व आई सुमन कदम यांच्या पेन्शनचे काढून आणलेली दोन लाख रुपये इतकी रक्कम असा सुमारे अठरा ते वीस लाख रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला.अशाच पध्दतीने दत्तनगर येथील बाबासो नामदेव पाटील हेही आपल्या कुटुंबियांसह शाहूवाडी तालुक्यातील विरळे या ठिकाणी गेले होते.त्यांच्या शेजारी असणाऱ्या घरांना कड्या घालण्यात आल्या.त्याच्याही घरांचे कुलूप तोडून तिजोरी कटावणीने उचकटून तिजोरीतील चार ग्रॅमची अंगठी, सोन्याचे मणी व रोख रक्कम १७ हजार असा पाऊण लाख रुपयांचा ऐवज लंपास करण्यात आला वडगांव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विलास भोसले स्थानिक गुन्हा अन्वेषणचे पोलिस निरीक्षक कैलास कोडक, संतोष माने, शहाबाज शेख, रवींद्र करमळकर यांच्या पथकाने घटनास्थळी भेट दिली.

श्वानपथक व ठसे तज्ञांना पाचारण करण्यात आले आहे.याबाबत वडगाव पोलीसात गुन्हा दाखल झाला आहे.

